नागपुरातील तहसील कार्यालय बंद : प्रशासकीय अधिकारी हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 08:05 PM2020-07-17T20:05:34+5:302020-07-17T20:10:37+5:30
उपविभागीय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील सर्व प्रशासकीय अधिकारी हादरले आहेत. दरम्यान, तहसील कार्यालयातील संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याच्या चेंबरला कुलूप लावण्यात आले असून तहसील कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपविभागीय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील सर्व प्रशासकीय अधिकारी हादरले आहेत. दरम्यान, तहसील कार्यालयातील संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याच्या चेंबरला कुलूप लावण्यात आले असून तहसील कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने संपूर्ण प्रशासन हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्याकडे दहा क्वारंटाईन सेंटरची जबाबदारी होती. त्यांच्या जेवणापासूनची सर्व व्यवस्था ते पाहत होते. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरला भेटी देण्यापासून तर कोरोनाशी संबंधित सर्व बैठकांनाही त्यांना उपस्थित राहावे लागत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापासून महापालिका, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग आदी अधिकाऱ्यांशी त्यांचा संबंध यायचा. सोमवारपासून त्यांना बरे वाटत नव्हते. बुधवारी त्यांनी आपली तपासणी करून घेतली. तेव्हा ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयच नव्हे तर मनपासह सर्वच प्रशासकीय अधिकारी हादरलेले आहेत. शुक्रवारी सकाळीच संबंधित अधिकाऱ्यांचे चेंबरसह उपविभागीय कार्यालय, तहसील ऑफीस सॅनिटाईझ करण्यात आले. तहसील कार्यालयातील सर्व कामकाज बंद करण्यात आले. परिसरातील अर्जनवीस व स्टॅम्प विक्रेत्यांना परत पाठवण्यात आले. त्यामुळे आज संपूर्ण दिवस तहसील कार्यालय बंद होते. उद्या शनिवार आणि रविवार असल्याने कार्यालय बंदच राहील. तहसील ऑफिस सील करण्याबाबत अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, आज दिवसभर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आपणही पॉझिटिव्ह तर नाही ना, अशी भीती दिसून आली.