नागपुरात महिलांसाठी धावणार विशेष ‘तेजस्विनी बस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 08:17 PM2019-08-26T20:17:08+5:302019-08-26T20:18:15+5:30

मनपाच्या ‘आपली बस’च्या ताफ्यात महिलांसाठी विशेष इलेक्ट्रिकवर संचालित ‘तेजस्विनी बस’ लवकरच दाखल होणार असून या बसचे उद्घाटन येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये करण्याचे प्रस्तावित आहे.

Tejaswini bus to run for women in Nagpur | नागपुरात महिलांसाठी धावणार विशेष ‘तेजस्विनी बस’

नागपुरात महिलांसाठी धावणार विशेष ‘तेजस्विनी बस’

googlenewsNext
ठळक मुद्देइलेक्ट्रिक बस : चालक, वाहक ते सर्व कर्मचारी महिलाच राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीद्वारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मनपाच्या ‘आपली बस’च्या ताफ्यात महिलांसाठी विशेष इलेक्ट्रिकवर संचालित ‘तेजस्विनी बस’ लवकरच दाखल होणार असून या बसचे उद्घाटन येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे या बसमधील चालक, वाहक व बस आगारातील कर्मचारीही महिलाच राहणार असून शहीद कुटुंबातील मुलीच्या हस्ते पर्यावरणपूरक ‘तेजस्विनी बस’चे उद्घाटन करण्यात येणार आहे.
मनपा परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सोमवारी परिवहन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत समितीचे सदस्य राजेश घोडपागे, नितीन साठवणे, नरेंद्र वालदे, नागेश मानकर, सदस्या रूपा रॉय, वैशाली रोहनकर, मनीषा धावडे, अर्चना पाठक, विशाखा बांते, रूपाली ठाकर, उपायुक्त राजेश माहिते, परिवहन विभागाच्या ूसहायक आयुक्त किरण बगडे, निगम सचिव हरीश दुबे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे म्हणाले, ‘आपली बस’ सेवेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना सुविधा देण्याचा प्रयत्न असतो. मागील वर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीटमध्ये ५० टक्के सवलत देण्याची योजना राबविण्यात आली. याच श्रृंखलेमध्ये यावर्षी महिलांसाठी विशेष इलेक्ट्रिकवर संचालित ‘तेजस्विनी बस’ सुरू करण्यात येत आहे. इलेक्ट्रिकवरील ’तेजस्विनी बस’साठी लकडगंज येथे बस आगार तयार करण्यात येत असून या आगारालाही ‘मातृशक्ती बस आगार’ नाव देण्यात आले असल्याचेही कुकडे यांनी सांगितले.
‘एकलव्य’ योजनेद्वारे ५० रुपयांत दिवसभर प्रवास
‘आपली बस’ सेवेमध्ये पुन्हा एका नव्या योजनेद्वारे नागरिकांना सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. शहरात विविध कामांसाठी दिवसभर ‘आपली बस’ने फिरणाऱ्यांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाही. मनपा परिवहन विभागाच्या ‘एकलव्य’ योजनेद्वारे एकदा ५० रुपयाची पास काढल्यानंतर दिवसभर शहरात कोणत्याही भागामध्ये ‘आपली बस’ने प्रवास करता येणार आहे, असेही परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Tejaswini bus to run for women in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.