नागपुरातील टेकडी गणेश मंदिरासाठी आता सरळ मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:05 PM2019-01-01T22:05:21+5:302019-01-01T22:09:07+5:30
टेकडीच्या मंदिरासमोर झालेल्या उड्डाण पुलामुळे रस्ता वनवे झाला आहे. त्यातच टेकडी समोरील रेल्वेस्टेशन, मध्य प्रदेश परिवहन विभागाचे बसस्टॅण्ड, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे विभागीय कार्यालय असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. हा त्रास लवकरच कमी होणार आहे. मानस चौकातील सुभाष पुतळ्याच्या मागून थेट मंदिरापर्यंत २० मीटर रुंदीचा रस्ता बणनार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती आहे.
लोकमत विशेष
नागपूर : टेकडीच्या मंदिरासमोर झालेल्या उड्डाण पुलामुळे रस्ता वनवे झाला आहे. त्यातच टेकडी समोरील रेल्वेस्टेशन, मध्य प्रदेश परिवहन विभागाचे बसस्टॅण्ड, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे विभागीय कार्यालय असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. हा त्रास लवकरच कमी होणार आहे. मानस चौकातील सुभाष पुतळ्याच्या मागून थेट मंदिरापर्यंत २० मीटर रुंदीचा रस्ता बणनार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती आहे.
शिवाय मंदिरात वाहनांच्या पार्किंगची जागा सुद्धा अपुरी असल्याने खास मंदिराच्या पार्र्किंगसाठी एक एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. मंदिराचे संचालन करणारी ‘द अॅडव्हायजरी सोसायटी ऑफ गणेश टेम्पल’ ची गेल्या १० वर्षापासूनची ही मागणी होती. ३१ जानेवारी २०१५ ला यासंदर्भातील प्रस्ताव तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना दिले होते. तेव्हापासून समितीचा पाठपुरावा सुरू होता. विद्यमान संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी टेकडी गणेश मंदिराचा मार्ग सुकर केला आहे. संरक्षण मंत्रालय ही जागा मनपाच्या स्वाधीन करणार आहे. मनपा जागेचे हस्तांतरण टेकडी गणेश मंदिराला करणार आहे.
विशेष म्हणजे सणांच्या काळात गणेश मंदिरासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. मंदिरात येणारा ८५ टक्के भाविक हा मानस चौकाकडून येतो. भाविकाला उड्डाण पुलाला वळण देऊन, रेल्वेस्थानकासमोरून यावे लागते. या रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने भाविकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. मंदिराकडे असलेली पार्किंगची जागा सुद्धा अपुरी असल्याने, मंदिरासमोरील शाळेत पार्किंगची सोय करण्यात येते. काही लोक रस्त्यावरच वाहने पार्किंग करतात. हा त्रास लवकरच संपणार असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
खरे श्रेय गडकरींचे
संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याचे खरे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाते. त्यांनी १७ मे २०१५ रोजी मनोहर पर्रीकर यांना मंदिरात आणले होते. नागपूरकरांसाठी मंदिर किती श्रद्धेय आहे, याची प्रचिती करून दिली होती. पर्रीकर यांच्यानंतर निर्मला सीतारामण यांच्याकडेही त्यांनी पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. मंदिरासाठी पुलाच्या समांतर असा २० मीटर रुंद व १९० मीटर लांबीचा रस्ता बनणार आहे. भाविकांसाठी पार्किंगची सुद्धा सोय होणार आहे.
श्रीरंग कुळकर्णी, सचिव, द अॅडव्हायजरी सोसायटी ऑफ गणेश टेम्पल