'बीआरएस'चा मनपा निवडणुकीवर डोळा, इतर पक्षातून ‘इनकमिंग’वर भर
By कमलेश वानखेडे | Published: June 14, 2023 02:51 PM2023-06-14T14:51:03+5:302023-06-14T14:54:59+5:30
स्थानिक पातळीवर पाय रोवण्याचा प्रयत्न
नागपूर :नागपूर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरून स्थानिक पातळीवर आपला पाया भक्कम करण्याचा बेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने आखला आहे. महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची पक्षाची तयारी असून त्यासाठी आतापासूनच प्रभागनिहाय चाचपणी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पक्षाला रेडिमेड बळ मिळविण्यासाठी इतर पक्षातील ‘इनकमिंग’वर भर दिला जात आहे.
भारत राष्ट्र समितीचा देशपातळीवर विस्तार केला जात आहे. महाराष्ट्र राज्यभरात सर्व शक्तिनिशी कार्य सुरू आहे. विदर्भात सर्वदूर पक्ष विस्तार करण्यासाठी नागपूर येथे भारत राष्ट्र समिती पक्ष, विदर्भ च्या महाराष्ट्रातील पहिल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या हस्ते १५ जून रोजी दुपारी १ वाजता होत आहे. यानंतर दुपारी २ वाजता सुरेश भट सभागृहात कार्यकर्ता मोळावाही आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा देखील पार पडणार आहे.
या मेळाव्यानंतर लगेच संपूर्ण नागपूर शहरावर लक्ष केंद्रीत करण्याची योजना आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षातर्फे एक समिती स्थापन करून प्रत्येक प्रभागातील सक्षम उमेदवारांची चाचपणी करणार आहे. प्राप्त माहितीनुसार लवकरच पक्षाची नागपूर शहर व जिल्हा कार्यकारिणी देखील जाहीर केली जाणार आहे.
वेळ कमी पण पाठबळ मोठे
- महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी बीआरएसला तसा वेळ कमीच मिळणार आहे. मात्र, पक्षाकडे मोठे आर्थिक पाठबळ आहे. यामुळे पक्षाच्या प्रचार, प्रसारात अडचणी येणार नाहीत. उलट पक्षाकडून लढणाऱ्या इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढलेली दिसेल, असा दावा पक्षाकडून केला जात आहे.