सांगा, आम्ही जगायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:08 AM2021-05-11T04:08:44+5:302021-05-11T04:08:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : लाॅकडाऊन व संचारबंदीच्या काळात संक्रमणाच्या दहशतीत संपूर्ण शहराच्या स्वच्छतेची महत्त्वपूर्ण जबाबदारी महिला कामगार भक्कमपणे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : लाॅकडाऊन व संचारबंदीच्या काळात संक्रमणाच्या दहशतीत संपूर्ण शहराच्या स्वच्छतेची महत्त्वपूर्ण जबाबदारी महिला कामगार भक्कमपणे सांभाळत आहेत. दरराेज सकाळी शहरातील रस्त्यांची साफसफाई करणाऱ्या या महिला कामगारांच्या मजुरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नियमित काम करूनदेखील गेल्या तीन महिन्यांपासून मजुरीचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे सांगा, आम्ही जगायचे कसे, असा संतापजनक सवाल महिला कामगार विचारत आहेत.
नगर पंचायतमार्फत शहरातील अंतर्गत स्वच्छता कंत्राटी एजन्सीद्वारे केली जाते. जानेवारी महिन्यात कंत्राट संपल्यानंतर पुन्हा कंत्राटी प्रक्रिया पार पाडत फेब्रुवारी महिन्यापासून नव्या एजन्सीला स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आले. या एजन्सीच्या माध्यमातून ५० पेक्षा अधिक महिला कामगार २२५ रुपये दराने शहरात स्वच्छतेचे काम करतात. परंतु मागील तीन महिन्यापासून मजुरीची रक्कम थकीत असल्याची बाब महिला कामगारांनी सांगितली. यामध्ये पूर्वीच्या कंत्राटदार एजन्सीकडे एका महिन्याचे तर नव्या कंत्राटदार एजन्सीकडे दाेन महिन्याची मजुरी थकीत असल्याची व्यथा महिलांनी मांडली. हातावर पोट असलेल्या या महिला मजुरांचे कुटुंबीय लाॅकडाऊनमुळे घरीच आहे. इतर व्यवसाय व व्यवहार पूर्ण ठाम आहे. इकडे हाताला काम आहे, पण मजुरीचे पैसे मिळत नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.
....
लाॅकडाऊनमुळे अडचण
यासंदर्भात पूर्वीच्या एजन्सीचे कर्मचारी करण वाघमारे यांना विचारणा केली असता, प्रशासनाकडून दोन-चार दिवसांपूर्वीच थकीत रक्कम एजन्सीला प्राप्त झाली. मात्र मी स्वत: पाॅझिटिव्ह आहे. यातून बरा होताच मजुरांना थकीत रक्कम देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन एजन्सीचे हर्षल सुखदेवे यांना विचारले असता, मजुरांना दोन महिन्याची मजुरी देणे शिल्लक आहे. मात्र लाॅकडाऊनमुळे प्रशासनाकडून एजन्सीला देय असलेली रक्कम प्राप्त झाली नाही. मुख्याधिकारीसुद्धा रजेवर आहेत. येत्या चार-पाच दिवसात थकीत मजुरीचा प्रश्न सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.