सांगा, या ‘चंद्रिकां’ची जबाबदारी कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:01 PM2020-01-07T12:01:47+5:302020-01-07T12:02:16+5:30

कुणाच्याही आधाराविना शहरात कुठेही इतस्त: फिरताना दिसतात, त्या ‘चंद्रिकां’चे काय? असा प्रश्न वर्तमानात घडणाऱ्या निर्भया, दिशांसारख्या प्रकरणांवरून सहजच उपस्थित होतो.

Tell me, who is responsible for this girls'? | सांगा, या ‘चंद्रिकां’ची जबाबदारी कुणाची?

सांगा, या ‘चंद्रिकां’ची जबाबदारी कुणाची?

Next
ठळक मुद्देगतिमंद मुलींची व्यथा

प्रवीण खापरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सुखवस्तू कुटुंबातील मुलीही छळल्या जातात रोज, उघडकीस येते एखादीच ‘दामिनी-निर्भया’! घराचा रस्ता शोधताना भटकतात मुली, शोध लागतो तेव्हा सापडेच लागतात हाती आणि नामकरण होते ‘दिशा’!’’ रस्तोरस्ती निराधार दिशाहीन भटकणाऱ्या निर्व्याज-गतिमंद मुलींकडे तडफ नाही, आवाज नाही, म्हणून त्यांना ‘चंद्रिका’ म्हणायचे का! तर या चंद्रिका रोजच छळल्या जातात, रोज बलात्काराला बळी पडतात, त्यांचे काय? ही जबाबदारी कुणाची, समाजाची की सरकारची?
गतिमंद मुले-मुली, हे काही परग्रहावरचे प्राणी नाहीत. ते सर्वपरिचित असले तरी त्यांना सांभाळण्याचा अनुभव प्रत्येकाजवळ असेलच असेही नाही. कुणी त्यांच्याकडे सहानुभूतीने बघतो तर कुणी तुसड्या नजरेने. अशी मुले-मुली कुटूंबात आहेत, ते सुरक्षित आहेत. त्यांच्या दृष्टीकोनातून सुरक्षा हा संशोधनाचाच विषय असला तरी किमान कुणाच्या तरी आधाराने ते जगत आहेत आणि त्यांना हवे-नको त्याची काळजीही घेतली जात आहे. मात्र, कुणाच्याही आधाराविना शहरात कुठेही इतस्त: फिरताना दिसतात, त्या ‘चंद्रिकां’चे काय? असा प्रश्न वर्तमानात घडणाऱ्या निर्भया, दिशांसारख्या प्रकरणांवरून सहजच उपस्थित होतो. सीताबर्डी, यशवंत स्टेडियम, उड्डाणपुलांच्या खाली भिंतीच्या आसºयाने अशा अनेक चंद्रिका निर्व्याज अवस्थेत बसलेल्या दिसून येतात. भान नसल्यामुळे त्या एकट्याच असतात. त्या शांत असतात, त्यांना देवध्यानीही म्हणतात आणि समाजाला त्यांची ओळख मतीमंद, गतीमंद अशी आहे. त्याही तुमच्या-आमच्यासारखे हाडामासांनीच बनल्या आहेत, आवाजही आहेच. फक्त तहान-भूकेच्या वेळीच त्यांचे शब्द फुटतात. शब्द फुटले रे फुटले, त्यांचे लचके तोडणाऱ्यांचा गलका सज्जच असतो. भानशुन्य असल्यामुळे त्यांच्या आवाजाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्या वेळेपुरती त्यांची तहान-भूक मिटलेली असते! आणि तो कळपही तृप्त झालेला असतो. अशा प्रकारे त्या रोजच निर्दयी हातांनी कुस्करल्या जातात. अशा चंद्रिकांसाठी शासन, प्रशासन आणि समाजाची जबाबदारी नाही का? यांच्यासाठी एक जबाबदार समाज म्हणून काय केले जाते? असे प्रश्न उपस्थित होतात.


शासन-प्रशासन काय करते?
राज्यात कुणी उपाशी झोपू नये, कुणी उघड्यावर राहू नये आणि सर्वत्र शांतता-आनंद नांदावा हे कर्तव्य राज्यकर्त्यांचे आणि त्यांच्याकरवी योजना राबविणाऱ्या प्रशासनाचे असते. मात्र, शासन-प्रशासन अशा चंद्रिकांकडे सारासार दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. कधीकाळी याच शहरात भीक मागून जगणाऱ्या दिसायला कुरूप, वेड्या आणि चक्क म्हाताऱ्या बाईला दिवस गेल्याची घटना पुढे आली होती. अशाच परिस्थितीला एका भीक मागणाऱ्या कोवळ्या गतिमंद मुलीलाही सामोरे जावे लागले होते. या घटना अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या ठरल्या. त्यानंतर मात्र त्यावर कोणत्याच उपाययोजना राबविल्या गेल्या नाहीत, हेही सत्यच आहे.

म्हातारी गेल्यानंतर लेकीचे काय?
शहरात काही ठिकाणी माय लेकीच्या जोड्या उघड्यावर भीक मागून जगत आहेत. म्हातारीचे वय ७०च्या वर आणि गतीमंद लेकीचे वय ३०-३५. अशा म्हाताऱ्या किती दिवस जगणार आणि त्यांच्यानंतर त्या गतिमंद लेकीचे काय होणार? हा सुन्न करणारा प्रश्न उपस्थित होतो. शहरातील काही स्थळांवर एखाद दुसरी तरुण मुलगी देवध्यानी अवस्थेत फिरताना दिसते. त्यातील बऱ्यापैकी देखणी आहे. मानसिक स्थिती आणि प्रासंगिक परिस्थितीमुळे तिचा चेहरा काळवंडलेला. रस्त्यावर बसून चपलांना देव मानून हातांनी टाळ्या वाजवून अंतर्मनीच्या देवाची आराधना करताना दिसते. नंदनवन, सक्करदरा, रेशीमबाग, हनुमाननगर अशा ठिकाणी ती दिसून येते. ती कशी जगत असेल? हा प्रश्न तिचे तीच जाणे.

Web Title: Tell me, who is responsible for this girls'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.