ऊनसावलीच्या खेळात पारा घसरला, मात्र उष्मा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 10:31 AM2022-04-08T10:31:45+5:302022-04-08T10:37:09+5:30
विदर्भातील काही जिल्ह्यांतही आकाशात ढगांनी गर्दी केली हाेती. दरम्यान, हवामान विभागाने पुन्हा ९ ते ११ एप्रिलदरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
नागपूर : गुरुवारी सकाळपासून नागपूरचे आकाश ढगांनी व्यापले हाेते. ऊन-सावलीचा खेळ सुरू असताना उष्णतेने मात्र अंगाची लाहीलाही केली. ढगाळ वातावरणामुळे पारा काही अंशी घटला खरा; पण उष्णता कमी झाली नाही. विदर्भातील काही जिल्ह्यांतही आकाशात ढगांनी गर्दी केली हाेती. दरम्यान, हवामान विभागाने पुन्हा ९ ते ११ एप्रिलदरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
नागपूरला गुरुवारी आकाश ढगांनी आच्छादले हाेते. त्यामुळे सकाळच्या उन्हापासून थाेडा दिलासा मिळाला. मात्र दुपारी पुन्हा ऊन पसरले. सायंकाळी पुन्हा ढगांच्या गर्दीमुळे वातावरण काहीसे दिलासादायक हाेते. मात्र दिवसभर उकाडा जाणवत राहिला.
गुरुवारी तापमान ०.९ अंशांनी घटले व ४० अंशांची नाेंद करण्यात आली. अकाेल्याचे तापमान अंशत: घटले व २४ तासांत ४४ अंशांवरून ४३.९ अंशांवर आले. चंद्रपूरला ४२.२ अंशांची नाेंद झाली. त्यानंतर अमरावतीत ते १.४ अंशांनी घसरून ४१.८ अंशांवर पाेहोचले. वर्धा ४१ अंश, वाशिम ४२ अंश, यवतमाळ ४१.५ अंश व बुलढाणा ४०.६ अंश नाेंदविले गेले. गडचिराेली, गाेंदियामध्ये उष्णतेने काहिसा दिलासा दिला.
उष्माघाताचा धोका...
वेधशाळेने अकाेल्यासह काही भागांत १० एप्रिलपर्यंत उष्ण लाटेचा इशारा दिला हाेता. आता ९ ते ११ एप्रिलपर्यंत विदर्भाच्या काही भागांत उष्ण लहरींचा इशारा दिला आहे. तापमानाच्या अशा लहरीपणामुळे आराेग्यावरही परिणाम हाेत आहेत. डाेकेदुखी, उष्माघात, आदी आजारांचे त्रास वाढले आहेत. नागरिकांना या काळात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान खाते व डाॅक्टरांनी केले आहे.