आजचा दिवस चटके, मग पुन्हा अवकाळीचे सावट
By निशांत वानखेडे | Published: May 4, 2024 06:58 PM2024-05-04T18:58:48+5:302024-05-04T19:00:33+5:30
पश्चिम विदर्भात सूर्य तडपला : नागपूर, गाेंदियात ताप कमी
नागपूर : मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात उन्हाचे चटके भरपूर तापदायक ठरले आहेत. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात लाेक चांगलेच हाेरपळले. सूर्याचे चटके आणखी एक दिवस सहन करावे लागणार असून त्यानंतर साेमवारपासून चार दिवस विदर्भ व मराठवाड्यात ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे उन्हापासून दिलासा मिळण्याचा अंदाज आहे.
नागपूर व गाेंदिया वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यात सूर्यदेव चांगलाच तडपला आहे. सर्वच जिल्ह्यात शनिवारी कमाल तापमानात आंशिक वाढ झाली. अकाेल्यात पारा चांगलाच उसळला व सर्वाधिक ४४.३ अंशाची नाेंद झाली. याशिवाय चंद्रपूर, गडचिराेली, ब्रम्हपुरी, वर्धा, वाशिम व अमरावतीत दिवसाचा पारा ४३ अंशाच्या वर पाेहचला आहे. यवतमाळ ४२.२ अंशावर आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाहीलाही हाेत असून नागरिकांची हाेरपळ झाली आहे.
नागपूर व गाेंदियात तापमानात अंशत: वाढ झाली असून पारा ४१.५ अंशावर पाेहचला. मात्र पारा सरासरीच्या खाली आहे. नागपुरात दुपारपासून आकाशात उन-सावलीचा खेळ सुरू झाला व ढगांनी सूर्याचा ताप काही प्रमाणात कमी केला.
दरम्यान विदर्भासह मराठवाड्यात ६ मे पासून पुन्हा वातावरण बदलण्याचे संकेत आहेत. मेघालयात तयार हाेणारा झंझावात तसेच मराठवाडा आणि झारखंड, ओडिशा, दक्षिण छत्तीसगड आणि विदर्भात तयार हाेणाऱ्या सायक्लाेनिक सर्क्युलेशनमुळे अवकाळी पावसाचे सावट पसरणार आहे. हे अवकाळीचे सावट १० मे पर्यंत राहण्याचा अंदाज आहे. या काळात विदर्भ व मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांचा कडकडाट व वादळासह किरकाेळ पावसाचीही शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.