नागपूरकरांना पुन्हा ताप, चंद्रपूरकरांनाही उकाड्याची धाप
By निशांत वानखेडे | Published: June 13, 2024 07:50 PM2024-06-13T19:50:06+5:302024-06-13T19:50:34+5:30
पारा पुन्हा वाढला, दिलासा क्षणिक : ४८ तासात पूर्व विदर्भात पाऊस सक्रिय
निशांत वानखेडे, नागपूर : पूर्व विदर्भात बुधवारी मिळालेला पावसाळी गारव्याचा दिलासा क्षणिकच ठरला. गुरुवारी पुन्हा कमाल तापमानाने उसळी घेतली व नागपूर, चंद्रपूरचा पारा पुन्हा ४१ अंशाच्या वर चढला. त्यामुळे दिवसभर उकाड्याने छळ केला. दरम्यान हवामान विभागाने पुढच्या ४८ तासात पूर्व विदर्भात सर्वत्र पाऊस सक्रिय हाेईल, असा अंदाज वर्तविला आहे.
इतके दिवस जागेवर स्थिरावलेली माेसमी पावसाची बंगाल उपसागराची शाखा बुधवारी सक्रिय झाली व अकाेला, पुसदच्या पुढे सरकत चंद्रपूर, गडचिराेलीपर्यंत पाेहचली. मंगळवारी रात्री काही भागात पावसाने जाेरदार हजेरी लावली आणि तापमान माेठ्या फरकाने खाली घसरले. ब्रम्हपुरी ४५ अंशावरून ३१ अंशावर आले. मात्र २४ तासात पुन्हा वातावरण बदलले. तापमान पुन्हा वधारले. ब्रम्हपुरी ८.४ अंशाने वाढून ३९.८ अंशावर पारा पाेहचला. चंद्रपूर सर्वाधिक ४१.८ अंश, तर नागपूर त्याखालाेखाल ४१.१ अंशावर चढले. गडचिराेलीतही तापमान ७.२ अंशाने वाढत ३८.२ अंशावर पाेहचले. त्यामुळे नागपूरसह इतर भागातही उकाड्यात वाढ झाली.
यापुढे ४८ तासात मान्सून पूर्व विदर्भातील भागात सक्रिय हाेण्याचा अंदाज आहे. त्यामुळे १५ जूनपर्यंत नागरिकांची उष्णतेपासून पूर्णपणे सुटका हाेईल, अशी अपेक्षा करता येईल. महाराष्ट्राच्या इतर भागात सक्रिय झालेल्या पावसाचा जाेर पुढचे चार-पाच दिवस कमी हाेईल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.