तापमान वाढतेय, शाळा बंद ठेवा! नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:24 PM2019-04-29T22:24:33+5:302019-04-29T22:26:13+5:30
उन्हाचा पारा ४५ वर पोहचला आहे. सकाळपासूनच ऊन जाणवायला लागले आहे. शरीर भाजणाऱ्या या उन्हामुळे प्रत्येक जीव होरपळत आहे. हवामान खात्याने आठवडाभर उष्णतेची लाट जिल्ह्यात राहील, असा अंदाज वर्तविला आहे. त्याचा धसका जिल्हा प्रशासनाने घेतला असून शालेय विद्यार्थी उष्माघाताचे बळी पडू नयेत म्हणून शाळा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाचा पारा ४५ वर पोहचला आहे. सकाळपासूनच ऊन जाणवायला लागले आहे. शरीर भाजणाऱ्या या उन्हामुळे प्रत्येक जीव होरपळत आहे. हवामान खात्याने आठवडाभर उष्णतेची लाट जिल्ह्यात राहील, असा अंदाज वर्तविला आहे. त्याचा धसका जिल्हा प्रशासनाने घेतला असून शालेय विद्यार्थी उष्माघाताचे बळी पडू नयेत म्हणून शाळा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
हवामान खात्याने विदर्भात उन्हाळा अधिक तापणार असून, येणाऱ्या दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा परिणाम आरोग्यावर पडण्याचे संकेत आहेत. तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहचल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो. या दृष्टिकोनातून तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रातून मे महिन्यात सर्व शासकीय, अशासकीय, खासगी शाळा व विद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त वर्ग किंवा परीक्षा घेण्याची आवश्यकता असल्यास सकाळच्या सत्रात ११ वाजेपर्यंत आटोपण्याचे आदेश दिले आहेत. या सूचना त्यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, महापालिका व सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळांना दिल्या आहेत.
सर्व शाळांना देणार सूचना
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व अनुदानित, विना अनुदानित, जिल्हा परिषद शाळांच्या परीक्षा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपल्या आहे. निकाल १ मेपर्यंत लागल्यानंतर शाळांना २६ जूनपर्यंत सुट्या आहेत. पण ज्या शाळा उन्हाळ्याच्या दिवसात अतिरिक्त वर्ग घेण्यास इच्छुक असतात. अशा शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार अतिरिक्त वर्ग सकाळी १० च्या आत घेण्यासंदर्भात शिक्षण विभाग स्वतंत्र पत्र काढणार आहे.
शिवलिंग पटले, शिक्षणाधिकारी, माध्यमिक
सीबीएसई शाळांकडून दखल नाही
महाराष्ट्र शासनाचे नियम सीबीएसईच्या शाळा लागू करून घेत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी सीबीएसई शाळेत होणार नाही. सीबीएसई शाळांमध्ये ९ आणि १० वर्गाचे क्लासेस सुरू आहेत. दुपारी १ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना शिकविले जाते. सीबीएसईच्या शाळा महाराष्ट्र शासनाच्या नियमांना मानत नसल्याचा आरोप सीबीएससी स्कूल स्टाफ वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्ष दीपाली डबली यांनी केला आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयातही विचारणा केली असता, सीबीएससी शाळा आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे त्यांनी सांगितले.