आठवडाभरात पुन्हा तापमान वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:08 AM2021-04-23T04:08:49+5:302021-04-23T04:08:49+5:30
नागपूर : हवामान विभागाने तीन दिवसांपूर्वी दिलेला तुरळक पावसाचा अंदाज आता मागे पडला असून या आठवडाभरात नागपूरसह विदर्भ चांगलाच ...
नागपूर : हवामान विभागाने तीन दिवसांपूर्वी दिलेला तुरळक पावसाचा अंदाज आता मागे पडला असून या आठवडाभरात नागपूरसह विदर्भ चांगलाच तापणार आहे. वेधशाळेने गुरुवारी जाहीर केलेल्या नव्या अंदाजानुसार या आठवडाभराअखेर ४२ अंश सेल्सिअसवर तापमान पोहचण्याची शक्यता आहे.
नागपुरातील गुरुवारचे तापमान कालच्यापेक्षा ०.८ अंश सेल्सिअसने वाढले. मागील २४ तासांमध्ये शहरात ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सकाळी वातावरण बऱ्यापैकी असले तरी दुपारनंतर चांगलेच तापले. सकाळी आर्द्रता ५२ टक्के तर सायंकाळी ६ वाजता १९ टक्के नोंदविण्यात आली. विदर्भात नेहमीप्रमाणे चंद्रपूरचे तापमान आजही अधिक नोंदविले गेले. तिथे ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, बुलडाण्यातील तापमान सर्वात कमी म्हणजे ३६.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
वेधशाळेने तीन दिवसांपूर्वी या आठवड्यात काही ठिकाणी तुरळक पावसाचा इशारा दिला होता. मात्र वातावरणातील बदलामुळे आणि हवेची दिशा बदलल्याने संभाव्य परिणाम झाला आहे. पुढील २८ एप्रिलपर्यंत तापमान वाढणार असल्याचे वेधशाळेने म्हटले असून शेवटच्या दोन दिवसात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाजही वर्तविला आहे.