उष्ण हवेमुळे तापले नागपूर : तापमान ४५.२ अंश सेल्सिअसवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:39 PM2019-04-26T23:39:18+5:302019-04-26T23:40:17+5:30
कडक उन्हामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी या मोसमातील नागपूरचे तापमान पहिल्यांदाच ४५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. दुसरीकडे पुढील पाच दिवस अशीच भीषण गर्मी राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कडक उन्हामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी या मोसमातील नागपूरचे तापमान पहिल्यांदाच ४५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. दुसरीकडे पुढील पाच दिवस अशीच भीषण गर्मी राहणार आहे. हवामान विभागाने अगोदरच याचा अंदाज वर्तवित इशारा दिलेला आहे. शहरात शुक्रवारी सकाळपासूनच उन तापू लागले आहे. तर दुपारी उष्ण हवेच्या वाऱ्यामुळे त्रास आणखीनच वाढला आहे. सायंकाळनंतरही उष्ण वारे वाहत आहे.
सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ३९ टक्के होती. यातूनच उन्ह किती कडक असेल याचा अंदाज लावता येतो. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत नागपुरात ही आर्द्रता कमी होऊन १४ टक्के राहिली आहे. आर्द्रता कमी झाल्याने उन लागण्याची शक्यता वाडते. यामुळे शरीरातील पाण्याचा स्तर कमी होतो. नागपूरसह संपूर्ण विदर्भातच भीषण गर्मी आहे. अकोला ४६.४ डिग्रीसह राज्यभरात सर्वात गरम राहिले ब्रह्मपुरी (४५.८), वर्धा (४५.७), चंद्रपूर (४५.६), अमरावती (४५.४) येथे तापमान सरासरी पेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअस जास्त राहिले. तर यवतमाळमध्ये ४४.५, वाशिममध्ये ४४.२, गोंदिया ४३.८, गडचिरोलीमध्ये ४३.२ व बुलडाणामध्ये ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
ऑरेंज अलर्टवर विदर्भातील सहा जिल्हे
३० एप्रिलपर्यंत विदर्भातील सहा जिल्ह्यात भीषण उन पडणार आहे. यात नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. याला आॅरेंज अलर्ट असे म्हटले आहे. या दरम्यान तापमान सामान्यपेक्षा ३ ते ५ अंश सेल्सिअस अधिक राहील. या काळात आर्द्रता २० टक्के पेक्षा खाली राहील. उन्हाच्या थेट संपर्कात आल्याने बेशुद्ध होणे, उलटी येणे, ताप आदी होऊ शकतो. त्यामुळे दुपारी १२ ते ४.३० या कालावधीत घराबाहेर पडणे टाळावे.
असे वाढले तापमान
दिनांक तापमान (अंश सेल्सिअस)
२१ एप्रिल ३९.५
२२ एप्रिल ४१.४
२३ एप्रिल ४२.५
२४ एप्रिल ४३.४
२५ एप्रिल ४४.३
२६ एप्रिल ४५.२