नागपुरात दिवसभर तापला पारा, सायंकाळी पावसाच्या धारा
By निशांत वानखेडे | Updated: April 9, 2025 19:04 IST2025-04-09T19:03:51+5:302025-04-09T19:04:16+5:30
उष्ण लाटेच्या दिवशीच पावसाची हजेरी : पुढचे तीन-चार दिवस अवकाळीचे ढग

Temperatures remained high in Nagpur throughout the day, with torrential rain in the evening.
नागपूर : हवामान विभागाने वर्तविलेला अवकाळी पावसाचा अंदाज एक दिवस आधीच खरा ठरला. तसे दिवसभर नागपूरकरांना उन्हाच्या चटक्यांनी चांगलेच छळले पण सायंकाळी हाेता हाेता आकाशात ढगांची गर्दी दाटली आणि पावसाची सरही जाेरात बरसली. शहरात बुधवारी २ मि.मी. पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यात बहुतेक भागात पावसाची नाेंद झाली. अवकाळीचे हे ढग पुढचे तीन-चार दिवस कायम राहतील, असा अंदाज आहे.
तसे हवामान विभागाने विदर्भात दाेन दिवस उष्ण लाटेचा इशारा दिला हाेता. त्यातील ९ तारखेला नागपूरच्या परिसरात पारा चढेल, असा अंदाज हाेता. १० एप्रिलपासून ढगाळ वातावरण तयार हाेण्याचाही वेधशाळेचा अंदाज हाेता. बुधवारी अपेक्षेप्रमाणे पारा चढला नाही पण उन्हाची तीव्रता जाणवत हाेती. दिवसभर उन्हाने नागपूरकरांच्या अंगाची लाही केली. तापमान अंशत: खाली जात ४०.५ अंशाची नाेंद झाली. सायंकाळी मात्र अचानक वातावरण बदलले. आकाशात ढगांची गर्दी हाेत ५ वाजताच्या दरम्यान साेसाट्याच्या वाऱ्यासह पावसानेही हजेरी लावली.
नागपूरसह पूर्व विदर्भातील भंडारा व गाेंदियात सुद्धा ढगाळ वातावरण तयार हाेत पारा ४० अंशाच्या खाली घसरला आहे. चंद्रपूरला मात्र ४२.२ अंशावर पारा हाेता. अकाेला मात्र अद्यापही तापलेलाच आहे. बुधवारी कमाल तापमानात अंशत: घट झाली असली तरी पारा ४३.७ अंशावर हाेता. अमरावतीतही ४२ अंशाची नाेंद झाली. त्यात घट हाेईल, असा अंदाज आहे.
रात्रीचा पारा चढला
दरम्यान दिवसा उन्हाच्या चटक्यांसह रात्रीही उष्ण राहतील, असा अंदाज हाेता. त्यानुसार बहुतेक जिल्ह्यात रात्रीचे तापमान वाढल्याचे दिसून येत आहे. अकाेल्यात २८.४ अंश किमान तापमान हाेते, जे सरासरीच्या ४.५ अंशाने अधिक आहे. अमरावतीतही किमान तापमान २७.३ अंशावर हाेते. नागपूर २५.४, भंडारा २५, बुलढाणा २५.६ व वर्धा येथे रात्रीचा पारा २६.२ अंशावर हाेता.
या कारणामुळे अवकाळीचे ढग
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा आणि सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले असताना पश्चिम राजस्थान क्षेत्रात नव्याने तयार झालेला पश्चिमी झंझावात विदर्भाकडे सरकला आहे. शिवाय या क्षेत्रात सायक्लाेनिक सर्क्युलेशनही तयार झाले आहे. या प्रभावाने विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. १२ एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे.