दिवसा मंदिरात भजन आणि रात्री चोरी; नागपुरातील चोरटा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:12 AM2018-03-23T11:12:13+5:302018-03-23T11:12:20+5:30

शहर आणि जिल्ह्यातील २५ मंदिरांसह ४३ ठिकाणी चोरी करून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली.

Temple thief arrested by Nagpur police | दिवसा मंदिरात भजन आणि रात्री चोरी; नागपुरातील चोरटा गजाआड

दिवसा मंदिरात भजन आणि रात्री चोरी; नागपुरातील चोरटा गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्देदानपेट्या फोडण्यात सराईत४३ गुन्ह्यांची कबुली, बुरखाधारी अट्टल चोरटा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर आणि जिल्ह्यातील २५ मंदिरांसह ४३ ठिकाणी चोरी करून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली. दीपक ऊर्फ बजरंग ऊर्फ भजन ब्रह्मदास बनसोड (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो सिरसपेठमध्ये राहतो. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकीसह लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली.
बालाघाट जवळच्या खैरलांजी गावातील मूळनिवासी असलेला आरोपी दीपक बनसोड २०११ मध्ये नागपुरात आला. काही दिवस मिळेल ते काम केल्यानंतर तो चोरी-घरफोडीकडे वळला. रात्रीच्या वेळी मंदिरात कुणी राहत नाही, हे ध्यानात आल्याने त्याने मंदिरात चोरी करण्याचा सपाटा लावला. दानपेटी फोडण्यासोबतच तो मंदिरात देवीदेवतांच्या छत्री, मुकुट, पूजेचे साहित्य आणि अन्य दागिन्यांची चोरी करायचा. महालमधील मुन्शी गल्लीत आधार कार्ड बनवून देण्याचे काम करणाऱ्या विपीन इटनकर (वय ३१) यांच्याकडे गेल्या वर्षी ११ मे च्या रात्री चोरी झाली होती. त्यावेळी त्याने रोख, लॅपटॉप, आधार कार्ड चोरून नेले होते. जून २०१७ मध्ये दीपकने कामठीतील ड्रॅगन पॅलेसमध्ये प्रवेश करून दानपेटीची काच फोडली आणि ६ हजार रुपये चोरले. फुटलेली काच पायाला लागल्याने आरोपी दीपक त्यावेळी जखमी झाला होता. ही चोरीची घटना त्यावेळी सीसीटीव्हीत कैद झाली होती. मात्र, आरोपी गुन्हा करताना तोंडावर बुरखा (मास्क) घालून घ्यायचा. त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही. त्याने अशा प्रकारे शहरातील नंदनवन, गणेशपेठ, सोनेगांव, सीताबर्डी, अंबाझरी, कोतवाली, धंतोली, सक्करदरा, जरीपटका, हुडकेश्वर, पांचपावली, प्रतापनगर, गिट्टीखदान, इमामवाडा, मानकापूर, न्यू कामठी आणि ग्रामीण मधील कळमेश्वर, खापरखेडा, कोंढाळी, रामटेक, सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक चोऱ्या, घरफोड्या केल्या. यातून त्याने रोख रक्कमेसह दागिने, लॅपटॉप, मोबाईल आणि अन्य मौल्यवान चिजवस्तूसह तीन दुचाकीही चोरल्या.

गरजेनुसार चोरी
आरोपी दीपक बनसोड हा मंदिरातून चोरलेले दागिने अथवा चिजवस्तू विकत नव्हता. तो घरीच सजवून ठेवायचा. तर, त्याला ज्याची गरज आहे त्या गरजेनुसार चिजवस्तूंची चोरी करायचा. त्याला चहा, साखर अथवा घरगुती वापराचे जिन्नस पाहिजे असल्यास तो किराणा दुकान फोडायचा. तर, तेल, पावडर अथवा सौंदर्यप्रसाधने हवे असल्यास तो जनरल स्टोर्समध्ये हात मारायचा. पोलिसांनी त्याच्याकडून मंदिरातील मुकुट, छत्री, दानपेट्या, नाणी, सिलिंडर, भांडी आणि कूलर तसेच चोरलेली आणि नंतर चोरीसाठी वापरात आणलेली दुचाकी जप्त केली.

असा लागला हाती
शहर आणि ग्रामीण भागात धुमाकूळ घालणारा दीपक बनसोड सोमवारी, १९ मार्चच्या रात्री कोतवालीत संशयास्पद अवस्थेत फिरत होता. यावेळी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, प्रभाकर शिवूरकर, कमलाकर गड्डीमे, पीएसआय मंगला मोकाशे हवलदार शत्रूघ्न कडू, शैलेश ठवरे, अनिल दुबे, मनीश भोसले, श्याम कडू अतुल दवंडे, फिरोज शेख आणि शरीफ शेख यांचे पथक या भागात गस्त करीत होते. त्यांनी दीपकला थांबवून विचारपूस केली असता तो घाबरला. त्याच्या बॅगमध्ये लोखंडी रॉड, पेचकस, पेंचीस, टार्च, बुरखा आढळल्याने पोलिसांचा संशय वाढला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने तब्बल ४३ चोऱ्या घरफोडींची कबुली दिली, असेही उपायुक्त कदम यांनी सांगितले.

Web Title: Temple thief arrested by Nagpur police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा