राज्यातील अस्थायी डॉक्टर करणार ‘गांधीगिरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:09 AM2021-09-24T04:09:36+5:302021-09-24T04:09:36+5:30
कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देणाऱ्या राज्यातील जवळपास २७३ सहायक प्राध्यापक व १५० वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्थायी करण्याच्या ...
कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देणाऱ्या राज्यातील जवळपास २७३ सहायक प्राध्यापक व १५० वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्थायी करण्याच्या मागणीसाठी १५ व १६ ऑक्टोबर २०२० रोजी काळी रिबीन बांधून रुग्णसेवा दिली. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कक्षासमोर नारे देत निदर्शनेही केली; परंतु या आंदोलनाची शासनस्तरावर दखलच घेतली नाही. शासनाचा या उदासीन धोरणामुळे कोरोनाच्या काळात नाइलाजाने सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी स्थायी करण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले; परंतु आता वर्ष होत असतानाही यावर निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे आता बेमुदत उपोषणाचे हत्यार या डॉक्टरांनी उचलले आहे. महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनचे सचिव डॉ. समीर गोलावर म्हणाले, मागील ९ वर्षांपासून हे डॉक्टर अस्थायी पदावरून रुग्णसेवा देत आहेत; परंतु आतापर्यंत आश्वासनापलीकडे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मेयोचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे म्हणाले, कोरोना काळात ज्या अस्थायी डॉक्टरांनी काम केले अशा दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या डॉक्टरांना स्थायी करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी दिले होते; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच आता सर्वांना याचा विसर पडला आहे.