नागपुरात अस्थायी डॉक्टरांचा संप चिघळण्याच्या स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 10:19 PM2020-11-03T22:19:48+5:302020-11-03T22:22:12+5:30
Temporary doctors strike, Nagpur news अस्थायी डॉक्टरांचा सेवा नियमित करण्याच्या मागणीला घेऊन सोमवारपासून मेयो, मेडिकलमधील ३३ डॉक्टर सामूहिक रजेवर गेले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अस्थायी डॉक्टरांचा सेवा नियमित करण्याच्या मागणीला घेऊन सोमवारपासून मेयो, मेडिकलमधील ३३ डॉक्टर सामूहिक रजेवर गेले आहेत. मंगळवारी ‘महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटने’च्या (एमएसएमटी) नेतृत्वात आमदार विकास ठाकरे यांना भेटून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. परंतु आंदोलनाला कोणी गंभीरतेने घेत नसल्याचे पाहता ‘एमएसएमटी’ला या आंदोलनात सहभागी करून घेण्याचा अस्थायी डॉक्टरांचा प्रयत्न आहे. यात यश आल्यास हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुमारे ४५० वर अस्थायी डॉक्टर संपावर गेले आहेत. आंदोलनाचा आज दुसऱ्या दिवशी अस्थायी डॉक्टरांनी मेयो व मेडिकलच्या समोर नारे निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संघटनेचे अध्यक्ष डॉ. समीर गोलावार यांच्या नेतृत्वात आ. ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचे मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात मेयोमधील १५ तर मेडिकलमधील ३३ डॉक्टरांचा सहभाग आहे. यांची संख्या अत्यल्प असल्याने दोन्ही रुग्णालयातील रुग्णसेवेवर किंवा प्रशासकीय कामकाजावर फारसा प्रभाव पडला नाही. यामुळे आंदोलनात ‘एमएसएमटी’ला सहभागी करून घेण्याचा निर्णय अस्थायी डॉक्टरांनी घेतला आहे. त्यानुसार बुधवारी तसा प्रस्ताव दिला जाणार आहे. या आंदोलनाला ‘एमएसएमटी’चा बाहेरून पाठिंबा आहे. अस्थायी डॉक्टरांच्या आंदोलनातून ‘एमएसएमटी ’आपल्या मागण्याही शासनाकडे रेटून धरत आहे.