गोळीबारप्रकरणी वाहन निरीक्षक गीता सेजवळना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: January 25, 2024 06:27 PM2024-01-25T18:27:14+5:302024-01-25T18:27:45+5:30
सहकारी अधिकाऱ्यावर गोळी झाडण्याचे प्रकरण
नागपूर : मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचा आरोप असलेल्या मोटार वाहन निरीक्षक गीता सेजवळ यांना मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने गुरुवारी येत्या ३० जानेवारीपर्यंत सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला.
सेजवळ सध्या अहमदनगर येथे कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी पुढील तारखेपर्यंत रोज अहमदनगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये हजेरी लावावी, पोलिसांच्या तपासाला सहकार्य करावे इत्यादी निर्देश न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकार गुरुवारी सेजवळ यांच्या जामीन अर्जावर उत्तर सादर करू शकले नाही. परिणामी, सरकारला याकरिता पुढील तारखेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला.
५ मे २०२२ रोजी सकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास सर्व्हिस रिव्हॉल्व्हरची एक गोळी गायकवाड यांच्या डाव्या पायाच्या पोटरीमधून आरपार निघून उजव्या पायाच्या पोटरीमध्ये जाऊन फसली होती. सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खाली पडल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा त्यावेळी गायकवाड यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये ती गोळी सेजवळ यांनी झाडल्याचे स्पष्ट झाले, असे सरकारचे म्हणणे आहे. बजाजनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये गायकवाड यांचे घर आहे. त्या ठिकाणी ही घटना घडली होती. गुन्हे शाखा पोलिसांनी सेजवळ यांच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. सेजवळतर्फे वरिष्ठ ॲड. अनिल मार्डिकर व ॲड. समीर सोनवणे यांनी कामकाज पाहिले.