'कट' मारण्याचा मोह नडला; ‘बर्थ डे बाॅय’सह चाैघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 07:48 PM2021-12-28T19:48:06+5:302021-12-28T19:48:43+5:30
अनियंत्रित वेगामुळे एकाच दिशेने जाणाऱ्या दाेन माेटारसायकलींची जाेरदार धडक झाली. त्यात चाैघे गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये एका ‘बर्थ डे बाॅय’चा समावेश आहे. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा शिवारात मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
नागपूर : अनियंत्रित वेगामुळे एकाच दिशेने जाणाऱ्या दाेन माेटारसायकलींची जाेरदार धडक झाली. त्यात दाेन्ही माेटारसायकलींवरील चाैघे गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये एका ‘बर्थ डे बाॅय’चा समावेश आहे. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा (ता. नागपूर ग्रामीण) शिवारात मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
जखमींमध्ये ‘बर्थ डे बाॅय’ चेतन वाढवे (२२, रा. डिगडोह, एमआयडीसी, ता. हिंगणा), स्वप्निल मसराम (२४, रा. खुर्सापार कोंढाळी, ता. काटाेल), पीयूष पटले (१७, रा. उसगाव, जि. भंडारा) व माेहम्मद इजराईल (४०, रा. पिवळी नदी परिसर, यशोधरानगर, नागपूर) या चाैघांचा समावेश आहे. चेतन, स्वप्निल व पीयूष मित्र आहेत. ते चेतनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी खुर्सापार येथे गेले हाेते.
‘बर्थ डे पार्टी’ आटाेपल्यानंतर तिघेही माेटारसायकलने (क्र. एमएच ३१ एफएम १०९१) काेंढाळीहून नागपूरच्या दिशेने येत हाेते. त्याचवेळी माेहम्मद इजराईल माेटारसायकलने (क्र. एमएच २७ बीएन ८५१८) अमरावतीहून काेंढाळीमार्गे नागपूरला जात हाेते. या दाेन्ही माेटारसायकलींची आपसात धडक झाली आणि चाैघेही राेडवर काेसळल्याने गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून चाैघांनाही उपचारासाठी नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास हेडकाॅन्स्टेबल विशाल ताेडासे करीत आहेत.
कट मारण्याचा माेह
वाहन चालविताना तरुणांना दुसऱ्या वाहनाला कट मारण्याचा माेह सहसा अनावर हाेतो. धामणा शिवारात माेटारसायकलचालकाने (क्र. एमएच ३१एफएम-१०९१) समाेर असलेल्या माेहम्मद इजराईल यांच्या माेटारसायकलला कट मारला. यात चालकाचा अंदाज चुकल्याने दाेन्ही माेटारसायकली एकमेकांवर धडकल्या. यातील एक माेटारसायकल दुभाजकावर आदळली. या अपघातात ‘बर्थ डे बाॅय’ चेतनच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली आहे.