नागपुरात दहा लाखाची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 09:04 PM2020-09-11T21:04:50+5:302020-09-11T21:06:01+5:30
शाखेत रक्कम जमा करायला निघालेल्याच्या दुचाकीच्या डिक्कीतुन अज्ञात आरोपींनी दहा लाखांची रोकड चोरून नेली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाखेत रक्कम जमा करायला निघालेल्याच्या दुचाकीच्या डिक्कीतुन अज्ञात आरोपींनी दहा लाखांची रोकड चोरून नेली.
प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी ही घटना घडली. फिर्यादी रवींद्र नत्थुजी न बारई (रा. कोतवाल नगर, नागपूर) यांच्या भावाचा काटोल येथे रिफायनरी ऑईलचा कारखाना आहे. कारखान्याच्या व्यवहाराची रक्कम १० लाख रुपये बारई यांचेकडे काम करणारे कर्मचारी प्रशांत कांबळे आणि प्रशांत वंजारी हे दोघे गुरुवारी दुपारी २ वाजता घेऊन निघाले. ही रोकड त्यांना युनियन बँकेच्या गांधीबाग शाखेत जमा करायची होती. त्यांनी रोकड ज्युपिटर दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि बँकेत गेले. मात्र बँक बंद झाल्यामुळे ते आॅफिसकडे परत निघाले. छत्रपती नगरात आले असता पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्यांनी आपली दुचाकी उभी करून पाण्यापासून बचावासाठी आश्रय घेतला. तेवढ्यात दोन आरोपींनी दुचाकीची डिक्की उघडून त्यातील १० लाखाची रोकड लंपास केली. कांबळे आणि वंजारी यांनी या घटनेची माहिती बारई यांना दिली. त्यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी रात्री चोरीचा गुन्हा दाखल केला.
त्यानंतर आज सकाळी कांबळे आणि वंजारी यांना चौकशीसाठी बोलावले. मात्र ते वृत्त लिहिस्तोवर पोहोचले नव्हते.
प्रकरणात संशयास्पद दुवे
या प्रकरणात अनेक संशयास्पद दुवे असल्याचे पोलीस सांगतात.
आम्ही आजूबाजूच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून घटना आणि आरोपीच्या संबंधाने चौकशी करीत आहो, असेही प्रतापनगर पोलिसांनी सांगितले आहे.