दसºयाच्या पर्वावर मेट्रोची सोनपावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:46 AM2017-10-02T00:46:21+5:302017-10-02T00:46:47+5:30
उपराजधानीत दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर मेट्रो रेल्वेची सोनपावले दाखल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत ....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर मेट्रो रेल्वेची सोनपावले दाखल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत मेट्रो रेल्वेच्या ५.६ कि़मी.च्या पहिल्या ‘ट्रायल रन’ला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
नागपूर मेट्रो रेल्वे तिच्या निर्धारित वेळापत्रकानुसार नागपूरकरांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महामेट्रोच्या मिहान डेपोमध्ये शनिवार, ३० सप्टेंबरला आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कुपाल तुमाने, खा. विकास महात्मे, खा. संजय काकडे, स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, आ. सुधीर पारवे, आ. समीर मेघे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. जोगेंद्र कवाडे, माजी खा. दत्ता मेघे उपस्थित होते. ट्रायल रनचा मान गोंदिया येथील महिला ड्रायव्हर सुमेधा मेश्राम यांना मिळाला.
२० हजार जणांना रोजगार मिळणार
नागपूरकरांच्या स्वप्नातील ‘माझी मेट्रो’ खºया अर्थाने धावायला लागली आहे. देशात वेळेच्या आत धावणारी पहिली मेट्रो रेल्वे ठरली आहे. मेट्रो हे दळणवळणाचे साधनच नाही तर त्यामुळे शहराचे चित्र बदलणार आहे. त्याकडे आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून पाहिले पाहिजे. या प्रकल्पामुळे जवळपास २० हजार लोकांना रोजगार मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एकत्रितपणा असल्यास शहराची वाहतूक सुरळीत आणि व्यवस्थित होते. शिवाय वाहतुकीवरील ताण कमी होतो. विस्तारीकरणात लोकांच्या सुविधेसाठी मेट्रो कन्हान, बुटीबोरी आणि हिंगणापर्यंत नेण्याचा विचार आहे. पुण्यातील स्वार गेट येथे हब तयार करून वाहतूक व्यवस्थेचा एकत्रित विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जीएसटीमुळे नागपूर लॉजिस्टिक हब बनणार
दक्षिण कोरियाच्या दौºयात उपपंतप्रधानांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आर्थिक मदत करण्यास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. जीएसटीमुळे नागपूर हे लॉजिस्टिक हब बनणार आहे. नागपूर विमानतळावर कार्गो हबचा विकास करण्यासाठी सिंगापूर येथील चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकारी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मेट्रोचा कन्हान, बुटीबोरी, हिंगणापर्यंत विस्तार : गडकरी
नितीन गडकरी म्हणाले, नागपूरात मेट्रो रेल्वे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण ३८ कि़मी. धावणार आहे. प्रकल्प वेळेपूर्वीच पूर्ण होत असल्यामुळे यात जवळपास १००० ते १२०० कोटींची बचत होणार आहे. विस्तारीकरणात पुढे ती कन्हान, हिंगणा आणि बुटीबोरीपर्यंत धावणार आहे. नागपूरात अजनी येथे पॅसेंजर हब आणि खापरी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ८०० कोटींच्या गुंतवणुकीतून लॉजिस्टिक हबची निर्मिती करणार आहे. काम लवकरच सुरू होणार आहे. जागेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकरच निर्णय घ्यावा.