वेकोलिच्या दहा महिन्यात दहा खाणी
By admin | Published: October 26, 2015 02:53 AM2015-10-26T02:53:41+5:302015-10-26T02:53:41+5:30
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडतर्फे (वेकोलि) दहाव्या महिन्यात नववी व दहावी खाण सुरू केली जात आहे. विशेष म्हणजे,
नवव्या व दहाव्या खाणीचा आजपासून शुभारंभ : ६.७५ मिलियन टन उत्पादन क्षमता
नागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडतर्फे (वेकोलि) दहाव्या महिन्यात नववी व दहावी खाण सुरू केली जात आहे. विशेष म्हणजे, कंपनीने मागील आठ महिन्यात आठ खाणी सुरू केल्या आहेत. यापूर्वी असे कधीही झाले नाही.
आकडेवारी पाहता राष्ट्रीय कोळसा उत्पादनात वेकोलिची हिस्सेदारी ७.३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वेकोलिने नवीन खाणी सुरू करून आपल्या उत्पादनक्षमतेत १४ मिलियन टनाची वृद्घी केली आहे. यासोबतच कंपनीने आपली उत्पादनक्षमता ४० मिलियन टनावरून ६० मिलियन टनापर्यंत वाढविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. यातून कंपनीने तब्बल पाच वर्षानंतर कोळसा उत्पादन व विक्रीमध्ये सकारात्मक वृद्धी प्राप्त केली आहे. तसेच कंपनीला तीन वर्षानंतर प्रथमच ११६ कोटींचा करपूर्व नफा झाला आहे.
सध्या महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील पाच जिल्ह्यात वेकोलिच्या एकूण ८३ खाणी आहेत. तसेच महाराष्ट्रातील बहुतांश वीज उत्पादन प्रकल्पांना वेकोलितर्फे कोळसा पुरवठा केला जातो. याशिवाय मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेशातील शासकीय उपक्रम आणि इतर लघु उद्योगांनाही कोळसा दिला जातो. कंपनी नवीन खाणी सुरू करण्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया वेगाने पार पाडत आहे.
एवढेच नव्हे, तर पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने इको-माईन्स टुरिझम पार्कसंबंधी जनजागृती केली जात आहे. तसेच सामाजिक जबाबदारी म्हणून विविध सामाजिक उपक्रमही राबविले जात आहेत. यात स्वच्छ विद्यालय अभियान व तडाली येथील मल्टिस्पेशालिटी सेंट्रल हॉस्पिटलचा समावेश आहे.
कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) राजीव रंजन मिश्र यांच्या मते, कंपनीने ही उपलब्धी आपल्या जुन्याच संसाधनांच्या बळावर प्राप्त केली असून कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह व परिश्रमाने हे शक्य झाले आहे. (प्रतिनिधी)
दिनेश-यकोना आहेत नवीन खाणी
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (वेकोलि) नवव्या व दहाव्या खाणींमध्ये दिनेश व यकोना या खाणींचा समावेश आहे. यापैकी दिनेश या खाणीची ४.० मिलियन टन व यकोना खाणीची २.७५ मिलियन टन क्षमता असून या खाणींचा सोमवारी २६ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता उमरेड क्षेत्रातील मकरधोकडा येथे केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कोळसा, वीज, नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पीयूष गोयल आणि केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहतील.