जि.प.च्या जिल्हास्तरीय मेळाव्यात सहभागी होणार दहा हजार महिला
By गणेश हुड | Published: February 8, 2024 07:57 PM2024-02-08T19:57:26+5:302024-02-08T19:57:48+5:30
आता जिल्हास्तरावर मेळावा व महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच मैदानी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने नागपूर ग्रामीण तालुक्यातील गोटाळपांजरी ग्राऊंड कस्तुरी चौक येथे जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील दहा हजारांहून अधिक महिला सहभागी होणार असल्याची माहिती जि.प.च्या महिला बाल कल्याण सभापती प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
महिलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागातर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांसाठी महिला मेळाव्यासोबतच जेंडर प्रशिक्षण देण्यात आले. आता जिल्हास्तरावर मेळावा व महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच मैदानी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्याला जि.प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्षा कुंदा राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह आमदार, जि.प. पदाधिकारी, सदस्य तसेच सोशल मिडीया स्टार नेहा ठोंबरे उपस्थित राहणार आहेत. विभागाच्यावतीने गेल्या दोन वर्षात आजवर जिल्हा-तालुकास्तरावर ३९ महिला मेळावे आयोजित करण्यात आलेत. या मेळाव्यामध्ये जिल्हाभरातुन अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, बचत गट महिलांसह सामान्य शेतकरी महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार असल्याचे लेकुरवाळे यांनी सांगितले.