अंदमान एक्सप्रेस रोखल्याने रेल्वे स्थानकावर तणाव
By नरेश डोंगरे | Published: July 29, 2024 02:45 PM2024-07-29T14:45:16+5:302024-07-29T15:41:17+5:30
किसान आंदोलनाचे कार्यकर्ते : जेवण न मिळाल्याने केला हंगामा
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिणेतून दिल्लीकडे निघालेल्या किसान आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर ट्रेन रोखली. सुमारे अर्धा ते पाऊण तास आक्रमकता दाखवत आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याने रेल्वेगाडीला विलंब झाला. परिणामी प्रवासीही संतप्त झाल्याने तणाव निर्माण झाला होता. शिर्षस्थ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची मागणी समजून घेत ती पूर्ण केल्यानंतर वातावरण निवळले.
दक्षिणेतील किसान आंदोलनाचे शेकडो कार्यकर्ते दोन दिवसांपूर्वी दिल्लीला होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. गाडीत त्यांच्या आंदोलक पवित्र्यामुळे त्यांना रविवारी नर्मदापूरममध्ये उतरून देण्यात आले. तेथे त्यांनी जोरदार हंगामा केल्याने नंतर त्यांना गाडी क्रमांक १६०३२ अंदमान एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले. आज सकाळी १०.३० च्या सुमारास ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचली. येथे त्यांनी आपल्याला गाडीत जेवण न मिळाल्याची तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे पाहून आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी गाडीच्या इंजिनवर चढून, आडवे होऊन जोरदार घोषणाबाजी केली.
सुमारे अर्धा ते पाऊणतास त्यांचे 'गाडी रोखो आंदोलन' सुरू होते. त्यांची रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी समजूत काढत होते. दुसरीकडे गाडीला विलंब होत असल्याने या गाडीतील प्रवासीही संतप्त झाले होते. तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनोफ्रेण्ड करून आंदोलकांची मागणी समजून घेतली. त्यांना लगेच जेवण उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली.