ताण घेतोय प्राण !
By admin | Published: July 20, 2015 03:07 AM2015-07-20T03:07:31+5:302015-07-20T03:07:31+5:30
आज तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले तरी कुटुंबातील जवळचे लोक मात्र एकमेकांपासून दूर होत आहे.
योगेश पांडे नागपूर
आज तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले तरी कुटुंबातील जवळचे लोक मात्र एकमेकांपासून दूर होत आहे. उपलब्ध सुखसुविधांमध्ये वाढ होत असतानादेखील दैनंदिन जीवन मात्र ताणतणावाचे झाले आहे. यातूनच निर्माण होणाऱ्या कौटुंबिक कलहातून चक्क जीव देण्यापर्यंत लोकांची मजल जात आहे. २०१४ या वर्षात कौटुंबिक ताणामुळे नागपुरात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. ‘एनसीआरबी’ने (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे.
आत्महत्यांत नागपूर राज्यात तिसरे
२०१४ या वर्षात नागपुरात ५१३ जणांनी आत्महत्या केल्या. यात ४०० पुरुष व ११३ महिलांचा समावेश आहे. पुरुषांच्या आत्महत्येची टक्केवारी ही सुमारे ८० टक्के इतकी आहे. मुंबई व पुण्यानंतर नागपुरातच आत्महत्येच्या सर्वात जास्त घटना घडल्या आहेत. २०१३ साली शहरात ५२३ आत्महत्या झाल्या होत्या.
‘तेरे बिन’ थेट आत्महत्याच
दरम्यान, प्रेमसंबंधात आलेल्या अपयशामुळे प्रेमवीरांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. २०१४ वर्षात ३१ प्रेमवीरांनी जीव दिला. यात २० तरुण व ११ तरुणांचा समावेश आहे. मागील वर्षी आत्महत्येचा आकडा २१ होता. २०१० सालापासून म्हणजेच गेल्या पाच वर्षांत ११३ जणांनी प्रेमप्रकरणांतून आत्महत्या केल्या आहेत. जात, धर्म, वय, पैसे इत्यादी कारणांमुळे प्रेमाला घरातील लोकांचा विरोध होतो व यातूनच प्रेमात पडलेली व्यक्ती सारासर विचार न करता आयुष्याला संपविते. आश्चर्याची बाब म्हणजे रोजगार नसल्यामुळे नैराश्याचे प्रमाण वाढत असले तरी प्रेमप्रकरणांतून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. बेरोजगारीच्या समस्येतून केवळ एकच आत्महत्या झाली. बेरोजगारीतून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दरवर्षी खालावत आहे. २०१३ मध्ये ४, २०१४ मध्ये १० तर २०१० मध्ये १५ जणांनी या कारणातून जीव दिला होता.