प्रणयच्या मृत्यूने नागपूरच्या  मरारटोलीत तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 01:36 AM2018-04-10T01:36:37+5:302018-04-10T01:36:52+5:30

मरारटोलीतील रहिवासी प्रणय कावते याच्या हत्येनंतर रविवारी रात्री त्याच्या समर्थकांनी जोरदार दगडफेक केली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आज सकाळपासूनच परिसरात कडक बंदोबस्त लावला होता. या हत्याकांडामुळे परिसरात पुन्हा एकदा गँगवॉर होण्याची भीती वर्तविली जात आहे.

Tension of Marartoli in Nagpur by the death Pranay |  प्रणयच्या मृत्यूने नागपूरच्या  मरारटोलीत तणाव

 प्रणयच्या मृत्यूने नागपूरच्या  मरारटोलीत तणाव

Next
ठळक मुद्देजोरदार दगडफेक : ‘गँगवॉर’ची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मरारटोलीतील रहिवासी प्रणय कावते याच्या हत्येनंतर रविवारी रात्री त्याच्या समर्थकांनी जोरदार दगडफेक केली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आज सकाळपासूनच परिसरात कडक बंदोबस्त लावला होता. या हत्याकांडामुळे परिसरात पुन्हा एकदा गँगवॉर होण्याची भीती वर्तविली जात आहे.
५ एप्रिल रोजी दुपारी १९ वर्षीय प्रणयवर अभिनव ऊर्फ बाबा गजबेने आपल्या चार अल्पवयीन साथीदारासोबत सशस्त्र हल्ला केला होता. चाकू, तलवार आणि दगडाचे गंभीर घाव घालून त्यांनी प्रणयला गंभीर जखमी केले होते. त्याच्यावर एका खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. रविवारी रात्री डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्रणयने आपल्या साथीदारांसह २०१६ मध्ये अंबाझरीतील कुख्यात गुन्हेगार नीलेश ऊर्फ बग्गा विठ्ठल कौरती ऊर्फ बग्गा बाबा याची हत्या केली होती. यानंतर अभिनव ऊर्फ बावा गजबेने आपली बुवाबाजीची दुकानदारी सुरू केली. दरम्यान, प्रणय सप्टेंबर २०१७ मध्ये बग्गाच्या खूनप्रकरणात जामीन घेऊन तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर त्याने मरारटोलीत आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परिणामी अभिनव आणि त्याचे साथीदार दुखावले. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले. ५ एप्रिल रोजी सकाळी त्यांचा प्रणयसोबत वाद झाल्यानंतर प्रणयने पाहून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे आरोपी अभिनव गजबेने आपल्या चार अल्पवयीन साथीदारांना सोबत घेऊन स्कूटरवर जाणाऱ्या प्रणयवर हल्ला चढवला. त्याला खाली पाडून त्याच्यावर चाकू आणि तलवारीचे घाव घातले. दगडानेही ठेचले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी अभिनव व त्याच्या साथीदाराला त्याच दिवशी अटक केली. तिकडे गंभीर अवस्थेत रुग्णालयात असलेल्या प्रणयचा रविवारी मृत्यू झाला. रात्री ही वार्ता कळताच प्रणयचे साथीदार बिथरले. त्यांनी मरारटोलीतील दुकानांवर दगडफेक करून दहशत निर्माण केली. परिणामी सोमवारी सकाळपासूनच पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त मरारटोलीत लावण्यात आला. त्यामुळे दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते.

सुपारी किलिंग?
प्रणयची हत्या सुपारी देऊन करण्यात आल्याची गुन्हेगारी वर्तुळात चर्चा आहे. बग्गा बाबाच्या हत्येचा सूड घेण्यासाठीच प्रणयचा गेम झाल्याचीही जोरदार चर्चा आहे. या हत्याकांडानंतर अंबाझरीत पुन्हा गँगवॉर भडकण्याची भीती वर्तविली जात आहे.
 

Web Title: Tension of Marartoli in Nagpur by the death Pranay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.