भाजपला जुन्या पेन्शनचे टेन्शन, पिक्चर अभी बाकी हैं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2023 10:54 PM2023-02-02T22:54:07+5:302023-02-02T22:54:34+5:30
Nagpur News शिक्षक मतदारसंघात ५० टक्के मतदारांनी महाविकास आघाडीला एकतर्फी कौल दिला. जुनी पेन्शनच्या मुद्द्याने भाजपचे टेन्शन वाढविले. हाच ट्रेंड कायम राहिला तर मात्र लोकसभा व विधानसभेतही भाजपा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कमलेश वानखेडे
नागपूर : पदवीधर मतदारसंघानंतर आता नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला. गडकरी-फडणवीस- बावनकुळेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला दुसरा धक्का बसला. बारामती जिंकायला निघालेल्या भाजप नेत्यांना आपलं गाव ‘नागपूर’ वाचविता आले नाही. शिक्षक मतदारसंघात ५० टक्के मतदारांनी महाविकास आघाडीला एकतर्फी कौल दिला. जुनी पेन्शनच्या मुद्द्याने भाजपचे टेन्शन वाढविले. हाच ट्रेंड कायम राहिला तर मात्र लोकसभा व विधानसभेतही भाजपा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निकालाने उत्साहात आलेले महाविकास आघाडीचे नेते पिक्चर अभी बाकी हैं... असं ठासून सांगत आहेत.
नागपूर शिक्षक मतदारसंघात ३४ हजारांवर मतदान झाले. महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी एकतर्फी ५० टक्क्यांहून अधिक मते घेत भाजपच्या तोंडून विजय हिसकावला. एवढा एकतर्फी पराभव भाजपच्या ‘पोल मॅनेजर’लादेखील अपेक्षित नव्हता. मात्र अडबाले यांनी एकतर्फी मिळालेली मते व मतांमध्ये असलेला साडेआठ हजार मतांचा फरक भाजप नेत्यांना धडकी भरवणारा आहे. नुकतेच एका वृत्त वाहिनीच्या सर्वेक्षणात राज्यात लोकसभेत महाविकास आघाडीला तब्बल ३४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीने एकप्रकारे या सर्वेक्षणावर शिक्कामोर्तब केले असून, त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.
फडणवीसांचा व्हिडीओ, शिक्षकांमध्ये रोष
- जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर अधिवेशनात जरा जास्तच स्पष्ट बोलले. राज्याची आर्थिक स्थिती पाहता जुनी पेन्शन देणे कठीण आहे, या त्यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओ खूप व्हायरल झाला. फडणवीसांनीच नकार दिल्यावर आता पेन्शन मिळणार नाही, अशी शिक्षकांची खात्री पटली व रोष वाढला. शेवटी शिक्षकांनी मतदानातून रोष व्यक्त केला.
गाणार...जाणार.. हे तेव्हाच ठरले
- नागो गाणार यांच्या दोन टर्म पूर्ण झाल्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यास अंतर्गत विरोध होता. माजी आमदार सुधाकर कोहळे व भाजप शिक्षक आघाडीचे अनिल शिवनकर यांची नावे चर्चेत होती. पण विरोधानंतरही उमेदवार बदलला नाही. तेव्हाच गाणार...जाणार...हे स्पष्ट झाले होते.
महाविकास आघाडी एकसंघ लढली
- काँग्रेसमध्ये अडबाले की झाडे यावर बरेच मंथन झाले. हा पेच सुटण्यापूर्वीच मुंबईच्या बैठकीत नागपूरची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. काँग्रेस नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. माजी मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार, आ. अभिजित वंजारी, डॉ. बबनराव तायवाडे यांनी अखेरपर्यंत किल्ला लढविला. शेवटी नाशिकची जागा शिवसेनेला सुटली व बदल्यात नागपूरची जागा काँग्रेसला मिळाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले. शिवसेनेनेही उमेदवारी मागे घेतली. राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार यांनी बंडखोरी करताच त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना हे तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकसंघ लढले. त्यामुळे अडबाले यांना बळ मिळाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना व माजी आ. विश्वनाथ डायगव्हाणे यांनी घेतलेल्या परिश्रमाला फळ मिळाले.