नागपुरातील मोमिनपुऱ्यात तणाव : बॅरिकेट्स हटवले नाहीत, उशीर झाल्याने वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:48 AM2020-05-29T00:48:11+5:302020-05-29T00:50:00+5:30
मोमिनपुरा येथील एका हार्ट अटॅक आलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला मेयो रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेट्स हटविले नाहीत. त्यामुळे उपचारास उशीर झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. यामुळे मोमिनपुरा परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोमिनपुरा येथील एका हार्ट अटॅक आलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला मेयो रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेट्स हटविले नाहीत. त्यामुळे उपचारास उशीर झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. यामुळे मोमिनपुरा परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
अब्दुल लतीफ अंसारी (८३) रा. तकिया मासूम शाह मोमिनपुरा असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजता घडली. अंसारी यांना ‘हार्ट अटॅक’ आल्याने त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु मोमिनपुºयाला लागून असलेल्या मेयो रुग्णालयाकडे जाणारा रस्ता चंद्रलोक बिल्डिंगजवळ बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी अशा अत्यावश्यक प्रसंगातही बॅरिकेट्स उघडले नाही. १५ ते २० मिनिटांचा वेळ वाया घालवला. नातेवाईकांनी मेयो रुग्णालयाची भिंत ओलांडून त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. परंतु तेव्हापर्यंत उशीर झाला होता. रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक नागरिक संतापले. ते भगवाघर चौकात एकत्र आले. घटनेची माहिती होताच तहसीलचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जयेश भांडारकर यांनी घटनास्थळी भेट दिली व नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांचे म्हणणे होते की, मेयो रुग्णालयाकडे जाणारा एक मार्ग उघडायला हवा. यावर भांडारकर यांनी त्यांची मागणी मनपाचे वरिष्ठ अधिकारी व मनपा आयुक्तांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. यानंतर नागरिक शांत झाले. काही नागरिकांचा आरोप आहे की, पोलीस त्यांच्याशी असभ्यपणे वागतात. जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रारही करण्यात आली आहे.
ठाणेदार जयेश भांडारकर यांच्यानुसार स्थानिक नागरिक मेयो रुग्णालयाकडे जाणारा एक मार्ग सुरू करण्याची मागणी करीत आहे. दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यांचे रोजगार बंद पडल्याने मनपा प्रशासनावर त्यांची नाराजी आहे. हा रस्ता बंद करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले आहेत. पोलीस केवळ आदेशांचे पालन करीत आहे. त्यांच्या तक्रारी व मागणी मनपा प्रशासन व वरिष्ठांपर्यंत पाहोचवल्या आहेत. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी हे शुक्रवारी मोमिनपुºयाचा दौरा करण्याची शक्यता आहे.