अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रूट्स महागले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:11 AM2021-08-20T04:11:38+5:302021-08-20T04:11:38+5:30
नागपूर : अफगाणिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे सुकामेव्याची आयात थांबल्यामुळे देशभरासह स्थानिक बाजारपेठांमध्येही भाव अचानक वाढू लागले आहेत. देशात सुकामेव्याचा पुरेसा ...
नागपूर : अफगाणिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे सुकामेव्याची आयात थांबल्यामुळे देशभरासह स्थानिक बाजारपेठांमध्येही भाव अचानक वाढू लागले आहेत. देशात सुकामेव्याचा पुरेसा साठा असून भाववाढ कृत्रिम असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. पुढे काही दिवसातच आयात सुरू होणार असून, भाव पूर्ववत होण्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे.
अफगाणिस्तातून भारतात जर्दाळू, अंजीर, मनुका, पिस्ता विक्रीसाठी येतो. पण १५ दिवसापासून आयात बंद झाल्याने ठोक बाजारात बारीक पिस्ता याचे भाव प्रति किलो १५०० रुपयावरून २१०० रुपये किलोवर तर मोठा पिस्ता याचे भाव १३०० रुपयांवर पोहोचले आहेत. बाजारात जर्दाळू ४०० ते ५०० रुपये किलो, छोटे अंजीर ७०० ते ७५० रुपये, मोठे अंजीर एक हजार ते ११०० रुपये, अफगाणी किसमिस ३०० ते ४०० रुपये किलो, मनुकाचे प्रति किलो भाव ३०० ते ४०० रुपयांवर पोहोचले आहेत.
सुकामेव्याचे ठोक व्यापारी भवरलाल जैन म्हणाले, नागपुरात सुकामेव्यात बदाम, काजू व किसमिसची सर्वाधिक विक्री होते. त्यातुलनेत जर्दाळू, पिस्ता, किसमिस, मनुकाची विक्री कमी आहे. बदाम कॅलिफोर्नियातून (अमेरिका) आयात होते. भाव दर्जानुसार ८०० ते ९५० रुपयादरम्यान आहेत. भामरी बदामची आयात इराण देशातून होते. या बदामचे दर ठोक बाजारात १६०० ते २२०० रुपये किलो असून, जास्त भावामुळे फार कमी विक्री होते. तर काजू इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिकेतून येतात. याशिवाय भारतात काजूची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. देशातील स्थानिक बाजारापेठांमध्ये सर्वाधिक विक्रीचा सुकामेवा अफगाणिस्तातून येत नाही. त्यामुळे त्याच्या भाववाढीवर अफगाणिस्तानातील घडामोडींचा नागपुरात काहीही परिणाम झालेला नाही. नागपुरात महिन्याला बदाम आणि काजूची प्रत्येकी ५० टन विक्री होते. पूर्वी सुकामेवा पाकिस्तानमार्गे भारतात यायचा. सध्या आयात पूर्णपणे बंद असली तरीही काही दिवसातच दुबईमार्गे सुकामेव्याची आवक होईल आणि किमती कमी होतील.
हे पाहा भाव (प्रति किलो)
तणावापूर्वीचे भाव सध्याचे भाव
पिस्ता १५०० २२००
जर्दाळू३००-४००४००-५००
किसमिस २५० २७०
अंजीर७५०-८५०८५०-९५०
शहरात सुकामेव्याचा पुरेसा साठा
शहरातील व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी सुकामेव्याचा भरपूर स्टॉक आहे. नागपूर बाजारात महिन्याला सर्व प्रकारचा ५० कोटींचा सुकामेवा विकल्या जात असल्याची माहिती आहे. त्यात ८० टक्के वाटा बदाम आणि काजूचा असून, दोन्हींचा अफगाणिस्तानशी संबंध नाही. त्यामुळे यांचे भाव फारसे वाढले नाही.
अडीच महिन्यावर दिवाळी असल्याने व्यापारी पॅकिंगमध्ये सुकामेवा विकण्याची तयारी आतापासूनच करतो. काहींची खरेदी सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव स्थिर आहे. पुढे भाववाढ झाली तरीही ग्राहक खरेदी करतोच. गेल्या काही वर्षांपासून सुकामेवा पॅकिंगला मागणी वाढली आहे.
अरुण कोटेचा, व्यापारी.
मागणी आणि पुरवठ्यावर सुकामेव्याचा व्यवसाय अवलंबून आहे. अनेकदा बदाम आणि काजूचे दर कमी होतात. आता थोडीफार वाढ झाली आहे. अफगाणिस्तानच्या घडामोडींचा या वस्तूंवर काहीही परिणाम झालेला नाही. सुकामेव्याची आयात पूर्ववत झाल्यास भाव कमी होण्याची अपेक्षा आहे.
भवरलाल जैन, व्यापारी.