रेतीच्या वादातून रोहण्यात तणाव

By admin | Published: September 27, 2015 03:01 AM2015-09-27T03:01:26+5:302015-09-27T03:01:26+5:30

सावनेर तालुक्यातील रोहणा परिसरातून रोज रात्री रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जाते. या वाहनांचा त्रास सहन करावा लागत असल्याने ...

Tensions to stop the dispute of the sand | रेतीच्या वादातून रोहण्यात तणाव

रेतीच्या वादातून रोहण्यात तणाव

Next

रात्री बोलावली आकस्मिक आमसभा : ओव्हरलोड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त
खापरखेडा : सावनेर तालुक्यातील रोहणा परिसरातून रोज रात्री रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जाते. या वाहनांचा त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी रेतीमाफियांकडे विचारणा केली. यातून वाद उद्भवल्याने येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच यावर निर्णय घेण्यासाठी रात्री उशिरा आकस्मिक आमसभाही बोलावण्यात आली. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला.
रोहणा शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पारडी रेतीघाटातून रेतीची मोठ्या प्रमाणात उचल केली जाते. ही रेती रोहणामार्गे इतरत्र पाठविली जाते. रेतीचे ओव्हरलोड ट्रक रात्रभर धावतात. नागपूर महानगरपालिकेने रोहणा परिसरात कन्हान नदीवर पुलाचे बांधकाम केले असून, या पुलावरून नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. हा पूल वापरण्यास हलक्या चारचाकी व दुचाकी वाहनांना परवानगी देण्यात आली असून, ओव्हरलोड व जड वाहनांना या पुलावरून वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हल्ली या पुलावरून ४० टन वजनाच्या रेतीच्या ट्रकची अव्याहतपणे वाहतूक सुरू आहे. वास्तवात या पुलाची क्षमता एवढ्या वजनाची नाही. असे असले तरी रेतीमाफिया या पुलावरून राजरोसपणे रेतीचे ओव्हरलोड ट्रक घेऊन जातात.
दरम्यान, प्रकाश खापरे रा. रोहणा यांनी शुक्रवारी सकाळी एका ट्रकचालकास या पुलावरून ट्रक नेऊ देण्यास मनाई केली. त्यांनी सदर रेतीचा ओव्हरलोड ट्रक अडविल्याने ट्रकचालक व खापरे यांच्या वाद उद्भवला. त्यामुळे रेती व्यावसायिक लतीफ अन्सारी हा माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचला.
त्याचवेळी माहिती मिळाल्याने ग्रामस्थही मोठ्या संख्येने तिथे पोहोचले. ग्रामस्थ व लतीफ अन्सारी यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली. ग्रामस्थांनी प्रकाश खापरे यांची बाजू उचलून धरली होती.
यावर तोडगा काढण्यासाठी सदर प्रकाराची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यातच शुक्रवारी रात्री स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने आकस्मिक आमसभा बोलावली. या आमसभेला महसूल विभागातील मंडळ अधिकारी प्रकाश हारगुडे, तलाठी रामटेके, पोलीस विभागातील बाबूलाल राठोड, पोलीसपाटील अरुण गोरले प्रामुख्याने उपस्थित होते.
यात ग्रामस्थांनी रेतीमाफियांच्या जाचाचा पाढाच वाचला. रेतीमाफियांच्या अरेरावीला पोलिसांनीही दुजोरा दिला. दरम्यान, पोलिसांनी रेतीमाफियांशी हातमिळवणी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या आमसभेत काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Tensions to stop the dispute of the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.