दहावीची परीक्षा ! आता वर्गातच उघडली जाणार प्रश्नपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 11:05 AM2018-03-01T11:05:23+5:302018-03-01T11:05:32+5:30
आता प्रश्नपत्रिका केंद्र संचालकाच्या कक्षात नाही तर थेट परीक्षा खोलीमध्ये अर्थात वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर पर्यवेक्षकाकडून उघडल्या जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावीची बोर्ड परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहे. यापूर्वी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आधी केंद्र संचालक आपल्या कक्षात उघडून संबंधित पर्यवेक्षकाच्या त्यांच्या परीक्षा खोलीतील विद्यार्थी संख्या पाहता प्रश्नपत्रिका वाटप करीत होते. परंतु आता प्रश्नपत्रिका केंद्र संचालकाच्या कक्षात नाही तर थेट परीक्षा खोलीमध्ये अर्थात वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर पर्यवेक्षकाकडून उघडल्या जाणार आहेत.
यापूर्वी केंद्र संचालकाच्या कक्षात पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अथवा २० मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिकांचे बंद पाकीट फोडून त्यातील प्रश्नपत्रिका वर्गनिहाय वाटप केले जात होते. त्यामुळे पेपर बाहेर जाण्याची शक्यता जास्त होती. पेपर सुरू झाल्यानंतर केवळ अर्ध्या तासात संपूर्ण पेपरचे उत्तर कॉपीच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहचविले जात असल्याचे धक्कादायक प्रकार पुढे आले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसमोर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. २४ फेब्रुवारीला झालेल्या मुख्याध्यापकांच्या बैठकीमध्ये बोर्डाने याबाबत सूचना केल्या आहेत.
दहावीच्या परीक्षेत एका वर्गखोलीत २५ विद्यार्थी बसविण्याची संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार २५ प्रश्नपत्रिका असलेले एक पाकीट पर्यवेक्षकाकडे सोपविले जाणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी सोडविलेले पेपर त्या केंद्रावरील केंद्र संचालक किंवा अतिरिक्त केंद्र संचालक कस्टडीत सोपविले जात होते. परंतु आता सहायक केंद्र संचालकाऐवजी सहायक परिरक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे परिरक्षक सर्व पेपर कस्टडीयनपर्यंत सोडतील, अशी व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक पेपरला परिरक्षक बदलणार आहेत.
परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरण्यास बंदी आहे. विद्यार्थी किंवा पर्यवेक्षकाकडे मोबाईल आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. नांद येथील जि. प. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर एकूण ३४२ विद्यार्थी परीक्षा देणार असून केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. परीक्षेदरम्यान पोलीस बंदोबस्त असणार आहे.
- प्रकाश धोटे, केंद्र संचालक,
जिल्हा परिषद हायस्कूल, नांद