ग्वालबन्सी टोळीविरुद्ध दहावा गुन्हा

By Admin | Published: May 3, 2017 02:13 AM2017-05-03T02:13:19+5:302017-05-03T02:13:19+5:30

शहरातील भू-माफिया दिलीप ग्वालबन्सी व त्यांच्या साथीदारांविरूद्ध जमीन हडपणे आणि हप्ता वसुली प्रकरणी

Tenth offense against Gwalbansi gang | ग्वालबन्सी टोळीविरुद्ध दहावा गुन्हा

ग्वालबन्सी टोळीविरुद्ध दहावा गुन्हा

googlenewsNext

सेवानिवृत्त वृद्घाची तक्रार : विनोदसिंग ठाकूरला अटक
नागपूर : शहरातील भू-माफिया दिलीप ग्वालबन्सी व त्यांच्या साथीदारांविरूद्ध जमीन हडपणे आणि हप्ता वसुली प्रकरणी मंगळवारी पोलिसांनी दहावा गुन्हा दाखल केला आहे.
ग्वालबन्सी याच्या साथीदारांमध्ये दीपक दुबे, ललनप्रसाद मिश्रा, विनोदसिंग ठाकूर, ईश्वर सुप्रेटकर ऊर्फ पहेलवान आणि जॉन अन्थोनी यांचा समावेश आहे. पोलिसांनी विनोदसिंग ठाकूर याला अटक केली आहे. याप्रकरणी कोलबास्वामी नगर येथील रहिवासी सुरेश धुर्वे या आयुध निर्माणमधील सेवानिवृत्त ६३ वर्षीय कर्मचाऱ्याने तक्रार केली आहे. धुर्वे यांच्यासह ११ लोकांनी गोरेवाडा येथे बिल्डर दीपक दुबे याच्याकडून प्लॉट खरेदी केला होता. परंतु ग्वालबन्सी व त्याच्या आरोपी साथीदारांनी धुर्वे आणि अन्य लोकांच्या प्लॉटवर कब्जा केला. शिवाय त्यांना मारहाण करू न त्यांना धमकी देऊ लागले. अनेक दिवसांपर्यंत असेच सुरू राहिले. दरम्यान आरोपींनी धुर्वे आणि अन्य लोकांनी त्यांच्या प्लॉटवर बांधलेली सुरक्षा भिंत पाडली. आरोपी धुर्वेसह अन्य लोकांकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांची मागणी करत होते. याप्रकरणी धुर्वे यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार केली. त्याआधारे मंगळवारी रात्री पोलिसांनी

गुन्हा दाखल करून, विनोदसिंग याला अटक केली. यानुसार ग्वालबन्सी टोळीविरूद्ध आतापर्यंत दहा गुन्हे दाखल झाले आहेत. यात ईश्वर पहेलवानविरुद्घ हा तिसरा गुन्हा आहे. तो मागील काही दिवसांपासून ग्वालबन्सीला मदत करीत आहे. कोराडी पोलिसांनी सोमवारी बिल्डर हाजी बशीर पटेल यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. दिलीप ग्वालबन्सी, ओम, मुन्ना व अन्य साथीदारांनी बशीर यांच्या दोन एकर जमिनीवर कब्जा केला आहे. त्यांना कब्जा सोडण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली जात होती. शिवाय हप्ता न दिल्यास जीवाशी मारण्याची धमकीही दिली जात होती. ग्वालबन्सी प्रकरणात आतापर्यंत दिलीप ग्वालबन्सी, माजी नगरसेवक राजेश माटे, बबली तिवारी व विनोद सिंग यांना अटक झाली आहे. याच दरम्यान दाभा येथील सचिन सोसायटीमधील प्लॉटधारकांनी आज आपल्या जमिनीचा कब्जा मिळविला. या जमिनीवर अनेक दिवसांपासून ग्वालबन्सीचा कब्जा होता. ग्वालबन्सी व त्याचे साथीदार प्लॉटधारकांना येथे येऊ देत नव्हते. त्यामुळे प्लॉटधारकांनी आज पोलिसांच्या उपस्थितीत आपल्या प्लॉटवर अधिकृत कब्जा मिळविला.
 

Web Title: Tenth offense against Gwalbansi gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.