दहावीच्या निकालाला होऊ शकतो उशीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:52+5:302021-06-30T04:06:52+5:30
नागपूर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तरी, विद्यार्थ्यांना गुणदान करायचे आहे. त्यासाठी गुणदानाची प्रक्रिया सुरू आहे. ५ जुलैपर्यंत मूल्यमापनाची ...
नागपूर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तरी, विद्यार्थ्यांना गुणदान करायचे आहे. त्यासाठी गुणदानाची प्रक्रिया सुरू आहे. ५ जुलैपर्यंत मूल्यमापनाची संपूर्ण प्रक्रिया शाळांना करायची आहे. सध्या नागपूर बोर्डाचे मूल्यांकनाचे ३१ टक्के काम पूर्ण झाले आहे. शाळांनी वेळेत मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण न केल्यास निकालाला उशीर होणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२० - २१साठी इयत्ता दहावीच्या परीक्षांचे मूल्यमापन निश्चित करण्यात आले आहे. ११ ते ३० जून या कालावधीत शाळांची जबाबदारी, विषयनिहाय शिक्षकांचे कर्तव्य, प्रत्यक्ष निकाल, निकाल समिती आणि मुख्याध्यापकांचे कर्तव्य आदी बाबी राज्य शिक्षण मंडळाने निश्चित केल्या आहेत. नववी आणि दहावीच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण द्यावे लागणार आहेत. निकषनिहाय गुण एकत्रित केल्यानंतर मुख्याध्यापकांना मंडळाने प्रसिद्ध केलेल्या लिंकद्वारे ते ऑनलाईन भरावे लागणार आहेत. ही सर्व प्रक्रिया २ जुलैपर्यंत पूर्ण करायची आहे. याशिवाय शाळानिहाय दहावीच्या गुणांची एकत्रित यादी, विद्यार्थ्यांचे नाव, आसन क्रमांकाची हार्ड कॉपी बंद पाकिटात मुख्याध्यापकांना विभागीय बोर्डाकडे पाठवावी लागणार आहे. यासाठी ५ जुलैपर्यंतची तारीख दिलेली आहे. ही पूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी अवघे ६ दिवस शिल्लक आहेत. परंतु आतापर्यंत ३१ टक्के विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे काम पूर्ण झाले आहे.
- नागपूर विभागीय मंडळाच्या मूल्यमापनाचा विद्यार्थीनिहाय आढावा
एकूण परीक्षार्थी - १,५६,५६२
मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण झालेले विद्यार्थी - ५८,३१४
मूल्यमापन झाले पण निश्चित केले नाही - ६५,६५८
मूल्यमापन अपूर्ण - ३२,५९०
- मूल्यमापनाच्या प्रक्रियेसंदर्भात बोर्डाने शाळांना वेळापत्रक दिलेले होते. विद्यार्थ्यांचा गुणांचा डाटा ऑनलाईन भरण्यासाठी लिंक दिली होती. अनेक शाळांनी लिंकवर डाटा टाकला आहे, पण तो निश्चित केलेला नाही. तो लवकरात लवकर निश्चित करावा व ज्या शाळांची कामे अपूर्ण आहेत, त्यांनी लवकरात लवकर कामे पूर्ण करावीत. तसे आमचे आजपर्यंत ७९.१८ टक्के मूल्यांकनाचे काम झाले आहे.
माधुरी सावरकर, सचिव, नागपूर विभागीय शिक्षण मंडळ