नवीन मूल्यांकन प्रणालीअंतर्गत आज दहावीचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:48+5:302021-07-16T04:07:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालांची शुक्रवारी दुपारी १ वाजता घोषणा होणार आहे. नवीन मूल्यांकन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालांची शुक्रवारी दुपारी १ वाजता घोषणा होणार आहे. नवीन मूल्यांकन प्रणाली अंतर्गत हा निकाल जाहीर होणार आहे. नागपूर विभागातील १ लाख ६२ हजार ५ विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. निकालाबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये धाकधूक असून या प्रणालीतून खरोखरच गुणवत्ता असलेल्या हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी ८४ हजार ४७३ विद्यार्थी व ७८ हजार २९३ विद्यार्थिनींनी अर्ज केला होता. कोरोनामुळे राज्य शासनाने परीक्षा रद्द केली होती. नवीन मूल्यांकन प्रणाली अंतर्गत निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मूल्यांकन प्रणाली अंतर्गत इयत्ता नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यांकन व दहावीची अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारावर निकाल तयार करण्यात आले आहेत. शिक्षण मंडळाच्या निकालाच्या संकेतस्थळावर विद्यार्थी निकाल पाहू शकतात. परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी निकालांबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता आहे. श्रेणीसुधारासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्यात आलेले नाही हे मंडळाने स्पष्ट केले आहे.
विभागातील विद्यार्थी
जिल्हा - नियमित परीक्षार्थी- खाजगी परीक्षार्थी - पुनर्परीक्षार्थी- इतर
भंडारा - १६,५२७ - १२ - ५४६ - १३
चंद्रपूर - २८,८५७ - १३२ - १,१४१ - ००
नागपूर - ६०,००५ - ३८१ - २,३२१ - ००
वर्धा - १६,३८० - ४९ - १,०१६ - ००
गडचिरोली - १४,४०९ - २० - ४११ - ००
गोंदिया - १९,२९१ - ४४ - ४६३ - ००