विशेष बुद्ध वंदना असा शब्दप्रयोग निरर्थक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:51 AM2020-05-23T00:51:49+5:302020-05-23T00:54:44+5:30
मानवाला दु:ख मुक्तीचा मार्ग सांगणारा विज्ञानवादी बुद्ध धम्म अंधश्रद्धेला नाकारणारा आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी सार्वजनिक कार्यक्रमात तसेच सोशल मीडियावर 'विशेष' बुद्ध वंदना असा शब्दप्रयोग करू नये, असे आवाहन आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवाला दु:ख मुक्तीचा मार्ग सांगणारा विज्ञानवादी बुद्ध धम्म अंधश्रद्धेला नाकारणारा आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी सार्वजनिक कार्यक्रमात तसेच सोशल मीडियावर 'विशेष' बुद्ध वंदना असा शब्दप्रयोग करू नये, असे आवाहन आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले आहे.
नुकतीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात पार पडली. आंबेडकरी अनुयायांनी कोरोनाच्या संकटात घरी राहूनच या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. उपराजधानीत बुद्ध आणि भीमजयंतीला कोरोनाचे संकट ओळखून भौतिक अंतर (शारीरिक अंतर) राखले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी संयमाचा परिचय दिला. मात्र, काही ठिकाणी सामाजिक संघटनांकडून सार्वजनिक कार्यक्रमात झालेल्या बुद्ध वंदनेला विशेष बुद्ध वंदना असा शब्दप्रयोग सोशल मीडियावर करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर ससाई यांनी आंबेडकरी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला.
बुद्ध वंदना ही बुद्ध वंदनाच आहे. प्रार्थनेला कोणत्याही विशेषणाची गरज नाही. विशेष बुद्ध वंदना असा शब्दप्रयोग निरर्थक आहे. निरर्थक शब्द प्रयोग करून समाजात भ्रम पसरवू नका, असे कळकळीचे आवाहनही ससाई यांनी केले.