जागेच्या वादात अडकले टर्मिनल मार्केट
By admin | Published: September 2, 2015 04:35 AM2015-09-02T04:35:17+5:302015-09-02T04:35:17+5:30
शेतमाल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहचविण्यासाठी नागपूर तालु्क्यातील वारंगा येथे उभारण्यात येणारे विदर्भातील पहिले
कमलेश वानखेडे ल्ल नागपूर
शेतमाल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहचविण्यासाठी नागपूर तालु्क्यातील वारंगा येथे उभारण्यात येणारे विदर्भातील पहिले टर्मिनल मार्केट जागेच्या वादात अडकले आहे. विदर्भातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने या प्रकल्पात लक्ष घालावे व वेळ न घालवता पर्यायी जागेचा शोध घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
केंद्र सरकारतर्फे राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर (वारंगा) अशा तीन ठिकाणी टर्मिनल मार्केट उभारण्याची घोषणा २०१० मध्ये करण्यात आली. सार्वजनिक खासगी सहभागावर (पीपीपी) हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. वारंंगा टर्मिनल मार्केटसाठी नाफेडतर्फे ७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची नोडल एजंसी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्य सरकारने संबंधित प्रकल्पासाठी महसूल विभागाची वारंगा येथील ९० एकर जमीन राज्य कृषी पणन मंडळाला हस्तांतरित केली. मंडळाने संबंधित प्रकल्पासाठी महापालिका, नासुप्र, अग्निशमन विभाग, पर्यावरण विभाग आदी विभागांकडून लागणारे ना हरकत प्रमाणपत्रही मिळविले.
काय आहे टर्मिनल मार्केट ?
४टर्मिनल मार्केटमध्ये सर्व सुविधायुक्त मार्केट विकसित केले जाते. येथे भाजीपाला, फळे यासह शेतमालाची खरेदी व विक्री केली जाते. कोल्ड स्टोरेज, मोठमोठे गोदाम उपलब्ध असतात. कृषीलाचे ग्रेडेशन करून दर्जेदार मालाची विभागणी केली जाते. मालाचे उत्तम पॅकेजिंग करण्याची व्यवस्था असते. मालाची गुणवत्ता कायम राखण्याची काळजी घेतली जाते. शेतकरी येथे आपला शेतमाल थेट आणू शकतात. दलाल किंवा मध्यस्थाची गरज नसते. शेतकऱ्यांकडून घेतलेला माल देशाच्या विविध भागात ट्रकने तसेच विदेशात कार्गो विमानांनी पाठविला जातो. टर्मिनल मार्केटमुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव व ग्राहकांना दर्जेदार माल उपलब्ध होतो.