अनैतिक संबंधांतून दृश्यम स्टाईल हत्या; मृतदेहासह बाईक पुरली १० फूट खड्ड्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 10:14 AM2020-02-03T10:14:27+5:302020-02-03T20:27:19+5:30

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाचा खून केल्यानंतर बाईकसह त्यास १० फूट खड्ड्यात पुरले. ही घटना पारडी ठाण्यांतर्गत कापसीत घडली.

Terminated young man for having sex Events in the sub-continent | अनैतिक संबंधांतून दृश्यम स्टाईल हत्या; मृतदेहासह बाईक पुरली १० फूट खड्ड्यात

अनैतिक संबंधांतून दृश्यम स्टाईल हत्या; मृतदेहासह बाईक पुरली १० फूट खड्ड्यात

googlenewsNext
ठळक मुद्देखून करून बाईकसह पुरलेपत्नीच्या प्रियकरासह तिघांना अटक

नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाचा खून केल्यानंतर बाईकसह त्यास १० फूट खड्ड्यात पुरले. ही घटना पारडी ठाण्यांतर्गत कापसीत घडली. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेचा गुन्हेशाखा पोलिसांनी पर्दाफाश करून सूत्रधारासह तीन आरोपींना अटक केली. अप्पर पोलीस आयुक्त नीलेश भरणे व निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. मृत पंकज दिलीप गिरमकर (३२) रा. समतानगर, वर्धा येथील रहिवासी होता. तर आरोपींमध्ये अमरसिंह उर्फ लल्लू जोगेंद्रसिंह ठाकूर (२४) कापसी, मनोज उर्फ मुन्ना रामप्रवेश तिवारी (३७) रा. बक्सर, बिहार आणि शुभम उर्फ तुषार राकेश डोंगरे (२८) इमामवाडा यांचा समावेश आहे.

आरोपींचा साथीदार बालाघाट येथील रहिवासी बाबाभाई फरार आहे. मृत पंकज गिरमकर कापसीच्या हल्दीराम फॅक्टरीत इलेक्ट्रिशियनचे काम करीत होता. तो मूळचा वर्धा येथील रहिवासी आहे. तो पत्नीसोबत कापसी परिसरात राहत होता. याच परिसरात खुनाचा सूत्रधार अमर सिंह राहतो. त्याचे कापसीत दोन धाबे आहेत. शेजारी असल्यामुळे वर्षभरापूर्वी दोघांची ओळख झाली. पत्नी आजारी असल्यामुळे पंकज अमरच्या धाब्यावरून टिफिन आणत होता. दरम्यान, त्यांची मैत्री झाली. त्याचा फायदा घेऊन अमर पंकजच्या पत्नीच्या संपर्कात आला. दोघांमध्ये चॅटिंंग आणि भेटी वाढल्या. त्याची माहिती कळताच पंकजने पत्नी आणि अमरला समजविण्याचा प्रयत्न केला. अमर ऐकत नसल्यामुळे पंकज नोव्हेंबर महिन्यात आपल्या मूळ गावी वर्ध्याला निघून गेला. तेथून तो नागपूरला ये-जा करीत होता. त्यानंतरही अमर पंकजच्या पत्नीसोबत चॅटिंग करीत होता.

अमरला समजविण्यासाठी २८ डिसेंबरला पंकज धाब्यावर आला. त्याने अमरला आपल्या पत्नीपासून दूर राहण्यास सांगितले. त्यामुळे अमर सिंह संतापला. त्याने पंकजचा खून करण्याचे ठरविले. त्यावेळी धाब्यावर पंकज डोंगरे उपस्थित होता. तो अमरचा मित्र आहे. अमरने शुभम डोंगरे, कुक मुन्ना तिवारी आणि वेटर बाबाभाई यांना खुनाच्या योजनेत सहभागी करून घेतले. अमर आणि शुभमने पंकजच्या डोक्यावर लोखंडाच्या घणाने वार केला. सात-आठ वार केल्यानंतर तो जाग्यावरच मृत्यू पावला. त्यानंतर अमरने मृतदेह ड्रममध्ये झाकून ठेवला. मृतदेह खोल खड्डयात पुरण्याचे ठरविले.

अमर आणि त्याच्या साथीदारांनी परिसरातील जेसीबी चालकाला शौचालयासाठी १० फूट खड्डा खोदण्यासाठी बोलावले. जेसीबी चालकाने खड्डा खोदल्यानंतर त्यात ५० किलो मीठ टाकून त्यात पंकजचा मृतदेह आणि बाईक टाकली. बाहेरची माती त्यावर टाकली. दुसºया दिवशी पुन्हा जेसीबी चालकाला बोलावून त्याला धाब्याचे कॉलम कमकुवत झाल्यामुळे खड्डा बुजविण्यास सांगितले. अजनी रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर पंकज बेपत्ता होता. कुटुंबीयांनी २९ डिसेंबरला धंतोली ठाण्यात तो हरविल्याची तक्रार दाखल केली. धंतोली पोलीस गुन्हा दाखल करून शांत झाले. दरम्यान, गुन्हे शाखेला पंकजचा खून झाल्याचे समजले. त्यांना पंकजचा अमरसोबत वाद झाल्याचे समजले. त्यांनी अमर तसेच कुक मुन्ना तिवारीची चौकशी केली. दोघांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. अखेर पोलिसांसमोर त्यांनी शरणागती पत्करून खून केल्याचे मान्य केले. त्यानंतर शुभम डोंगरेला अटक करण्यात आली.

आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रविवारी खड्डा खोदून पंकजचा मृतदेह आणि बाईक बाहेर काढली. ही कारवाई अप्पर आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल ताकसांडे, उपनिरीक्षक लक्ष्मीछाया तांबुस्कर, सहायक उपनिरीक्षक मोहनलाल साहू, हवालदार संतोष मदनकर, रामनरेश यादव, रवी साहू, सतीश पांडे, योगेश गुप्ता, शेषराव राऊत, चालक निनाजी तायडे, अरविंद झिलपे यांनी केली.

आणखी एका खुनाचे रहस्य उलगडले
पारडी ठाण्याच्या परिसरात याच पद्धतीने हरविलेल्या व्यक्तीचा खून करून त्याला जाळल्याची घटना घडली आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी या खुनाचे रहस्य उलगडले असून ही घटना तीन महिन्यापूर्वी घडली आहे. या प्रकरणात पोलीस सोमवारी माहिती देणार आहेत. पारडीत बाहेरील नागरिकांची संख्या अधिक आहे. अनेक नव्या वस्त्या झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनाही घटनेची माहिती होऊ शकत नाही.

ग्राहक बनून सोडविला पेच
खुनाच्या गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी पोलिसांना खूप परिश्रम घ्यावे लागले. पोलीस गोपनीय पद्धतीने ग्राहक बनून धाब्यावर जात होते. तेथे भोजन करून धाब्यावरील कर्मचाऱ्यांशी त्यांनी मैत्री केली. दरम्यान, धाब्याचे त्यांनी निरीक्षण केले. ज्या जोगेंदर सिंहच्या धाब्यावर मृतदेह पुरला होता, तेथे कर्मचारी अधिक दक्ष राहत होते. त्यामुळे पोलिसांना दाट शंका आली.

पत्नीची भूमिका तपासणार
पंकज वर्ध्याला गेल्यानंतर त्याने कौटुंबिक जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्याने पत्नीचा मोबाईल क्रमांक बदलला. अमरला हा क्रमांकही माहीत झाला. त्यावर तो तिच्याशी चॅटिंंग करीत होता. त्यामुळे पोलीस पंकजच्या पत्नीची यात काय भूमिका आहे, याचा तपास करीत आहेत. पोलिसांच्या मते अमर आणि पंकजच्या पत्नीच्या मोबाईलची तपासणी केल्यावर खरी बाब उजेडात येणार आहे. पंकजच्या कुटुंबात आईवडील, पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा आहे.

Web Title: Terminated young man for having sex Events in the sub-continent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून