सुभाषनगर परिसरात ‘दाऊद’, ’याकूब’ची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:09 AM2021-01-20T04:09:31+5:302021-01-20T04:09:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील सुभाषनगर व परिसरात मोकाट सांडांनी धुमाकूळ घातला आहे. दोन सांडांच्या झुंजीत घरासमोरील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील सुभाषनगर व परिसरात मोकाट सांडांनी धुमाकूळ घातला आहे. दोन सांडांच्या झुंजीत घरासमोरील वाहनांची मोडतोड होत आहे. बिथरलेल्या सांडांना हुसकावून लावणे शक्य नसल्याने लहान मुले व महिलांना सांडांमुळे घराबाहेर पडणे कठिण झाले आहे. या सांडांची गुंडांसारखीच दहशत असल्याने नागरिकांनी त्यांना कुख्यात गुंड दाऊद, याकूब व मन्या अशी टोपन नावे दिली आहेत.
सुभाषनगर येथील बिरसा मुंडा समाज मंदिर परिसरात मागील आठवडाभरापासून सांडांनी धुमाकूळ घातला आहे. दोन सांडांची झुंज बघण्यात मजा येत असली तरी यामुळे नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. परिसरातील समाजमंदिर मैदानात लहान मुले खेळत असतात. सांडांमुळे पालकांना आपल्या मुलांची चिंता लागली आाहे. रविवारी दोन सांडांच्या झुंजीत कार, दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. भाजीपाला विक्रेत्याचेही नुकसान झाले.
गेल्या वर्षी मनपाने शहरातील मोकाड सांड पकडण्याची तीव्र मोहीम राबविली होती. यात काही भागातील ३० ते ४० सांड पकडले होते. मात्र नंतर ही मोहीम थंडावली. तामिळनाडूचे पथकही निघून गेले.
शहरातील महावीरनगर, मानेवाडा, इंदोरा, पारडी, भांडेवाडी, सोनेगाव, हुडकेश्वर, सावरबांधे ले-आऊट, म्हाळगीनगर, मेडिकल चौक परिसर, दिघोरी, अजनी चौक, नंदनवन, केडीके कॉलेज परिसर, सोमवारी क्वॉर्टंर, नारा, नारी, टिमकी, भानखेडा यासह शहराच्या अन्य भागातही मोकाट सांडामुळे नागरिक त्रस्त आहेत.
......
मनपा प्रशासन हतबल
शहराच्या सर्वच भागात मोकाट सांडामुळे नागरिकांत दहशत आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. असे असूनही मनपा प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. मनुष्यबळ व यंत्रणा नसल्याने मनपाचा कोंडवाडा विभाग हतबल दिसत आहे. आयुक्तांनीच याची दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.