चिचघाट गावात चाेरट्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:47+5:302021-07-08T04:07:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : नजीकच्या चिचघाट (पुनर्वसन) येथे १८ जून राेजी धाडसी घरफाेडी करीत चाेरट्यांनी सव्वा लाखाचा मुद्देमाल ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : नजीकच्या चिचघाट (पुनर्वसन) येथे १८ जून राेजी धाडसी घरफाेडी करीत चाेरट्यांनी सव्वा लाखाचा मुद्देमाल चाेरून नेला. चाेरट्यांना पकडण्यात पाेलिसांना अद्यापही यश आलेले नाही. तेव्हापासून गावात चाेरट्यांचा धुमाकूळ वाढला असून, गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. परिणामी, गावातील तरुण लाठीकाठी, टाॅर्च घेऊन रात्रभर जागून काढत गस्त देत आहेत.
चिचघाट गावाचे माैदानजीक पुनर्वसन झाले असून, गावासभाेवताल पडीक व शेतजमीन आहे. गावात रात्री १२ वाजेनंतर चाेरटे येताना गावकऱ्यांनी बघितले आहे. त्यामुळे गावात पुन्हा चाेरटे आपला डाव साधतील, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगत आहे. रात्रीला चाेरट्यांची चाहूल लागताच गावातील तरुण मंडळी ‘चाेर आला रे आला’ असा कल्लाेळ करीत लाठीकाठी व टाॅर्च घेऊन धावत सुटतात. पाेलीसही गस्तीवर येतात आणि निघून जातात. गावात घरे विरळ असल्याने गावकऱ्यांमध्ये भीती वाढली असून, पाेलीस यंत्रणेने चाेरट्यांचा तात्काळ बंदाेबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.