दहशतवाद जिहादी असू शकत नाही

By admin | Published: December 27, 2015 03:16 AM2015-12-27T03:16:22+5:302015-12-27T03:16:22+5:30

जिहाद शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. धर्म संकटात असल्याचे सांगून दहशतवादी लोकांना संघटित करीत आहेत.

Terrorism can not be Jihadi | दहशतवाद जिहादी असू शकत नाही

दहशतवाद जिहादी असू शकत नाही

Next

तारिक अन्वर यांचे ठाम मत : ‘जिहाद विरुद्ध दहशतवाद’ चर्चासत्र
नागपूर : जिहाद शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. धर्म संकटात असल्याचे सांगून दहशतवादी लोकांना संघटित करीत आहेत. दहशतवाद जिहादी असूच शकत नाही, असे ठाम मत आॅल इंडिया कौमी तंझिमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तारिक अन्वर यांनी येथे व्यक्त केले.
आॅल इंडिया कौमी तंझिम (एआयक्यूटी) या संघटनेच्या विदर्भ विभागातर्फे ‘जिहाद विरुद्ध दहशतवाद’ या विषयावर सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे शनिवारी आयोजित चर्चासत्रात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
मंचावर मुख्य अतिथी म्हणून लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे, माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे राज्य सचिव अजय पाटील, आसरा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अजिज सोळंकी, चार्टर्ड अकाऊटंट डॉ. तेजिंदरसिंग रावल, आॅल इंडिया कौमी तंझिमचे महाराष्ट्रचे अध्यक्ष व अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम, फादर संजय कोहचाडे आणि शब्बीर विद्रोही उपस्थित होते. तारिक अन्वर म्हणाले, देशात सत्तारूढ सरकारचे सूत्रधार नागपुरात असल्यामुळे या चर्चासत्राचा प्रारंभ नागपुरात केला. पुढे देशातील सर्व राज्यात चर्चासत्र घेण्यात येणार आहे. व्यक्तीच्या भावना धर्माशी जुळल्या असल्यामुळे त्याला चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी धर्म हा सोपा मार्ग समजला जात आहे. हे चुकीचे आहे. यासाठी एकाने दुसऱ्या धर्माला समजून घेण्याची गरज आहे.
खा. विजय दर्डा म्हणाले, योग्यतेपुढे धर्म येऊ नये. धर्माच्या नावावर लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ‘आर्म्स फॉर पीस’च्या गोष्टी करणारे व्यवसाय करीत आहेत. आम्हाला काय करायचे आहे, हे प्रारंभी निश्चित करावे. यावेळी दर्डा यांनी महिला शिक्षणावर भर दिला. शिक्षण व्यक्ती बदलू शकते. विकास व रचनात्मकतेचे उदाहरण देताना त्यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा उल्लेख केला.
अखंडता कायम राखा
मुनाफ हकीम म्हणाले, एका-एका शब्दाबाबत भ्रम पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. देशाचे तुकडे करणाऱ्यांपासून सावध राहावे आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.
दुफळी निर्माण करतो दहशतवाद
इस्लामचे जाणकार मौलाना मुस्तफा रजा म्हणाले, गैरसमज शत्रुत्व निर्माण करते, तर शत्रुत्व दहशतवाद. अधिकाराचे रक्षण, अन्याय आणि दहशतवाद नष्ट करण्याचे काम जिहाद करते. जगातील अनेक संघटना मानवतेच्या शत्रू आहेत आणि जिहाद शब्दाचा चुकीचा अर्थ काढत आहे.
ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे म्हणाले, हुसेन यांनी जे केले तो जिहाद होता. धर्मावर बोलणाऱ्या अनेकांना धर्माची फार कमी माहिती असते. दुसऱ्या धर्माची माहिती असायला हवी.
डॉ. तेजिंदरसिंग रावल म्हणाले, शिखांनासुद्धा अशाच त्रास झाला होता. दहशतवादाला मुस्लीम सर्वाधिक बळी पडले आहेत. समाजात भीती निर्माण करणाऱ्यांचा धर्म केवळ दहशतवाद आहे.
वरिष्ठ नेते शब्बीर विद्रोही म्हणाले, स्वातंत्र्यांपूर्वी इंग्रज क्रांतिकारकांना दहशतवादी समजायचे. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच क्रांतिकारांना देशभक्त समजले गेले. पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ) यांनी सांगितले आहे की, देशाप्रति प्रेम असणे, ही देशभक्ती आहे. आपल्यातील स्वार्थ आणि वाईट भावना दूर करण्याची लढाई म्हणजेच जिहाद आहे.
संजय कोहचाडे म्हणाले, दहशतवादाच्या विरोधात प्रेमाचे हत्यार यशस्वी ठरले आहे. जगात दहशतवाद पसरविला जात आहे. तो जिहाद नाही. येशू मसिहाच्या संदेशाचे पालन केले तर हा विषयच राहणार नाही. यावेळी अनिल देशमुख आणि अजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.
संचालन मो. आसीम अली यांनी केले. यावेळी ‘एआयक्यूटी’ विदर्भ सचिव मो. फझल पटेल, अमरावतीचे अब्दुल रफीक, वरोराचे शेख झहीरुद्दीन, यवतमाळचे मिर्झा वसीम बेग, अकोलाचे शेख वसीम, वर्धाचे इरफान बेग, नागपूरचे सलीम खान आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.(प्रतिनिधी)

आॅल इंडिया कौमी तंझिम (एआयक्यूटी) या संघटनेच्या विदर्भ विभागातर्फे ‘जिहाद विरूद्ध दहशतवाद’ या विषयावर सिव्हिल लाईन्स येथील चिटणीस सेंटर येथे शनिवारी आयोजित चर्चासत्रात मौलाना मुस्तफा रजा यांच्या ‘आतंकवादी संघठन इस्लाम की कसोटीपर’ या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ‘एआयक्यूटी’चे अध्यक्ष खासदार तारिक अन्वर, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे, अनिल देशमुख, अजय पाटील, डॉ. अजिज सोळंकी, सीए डॉ. तेजिंदरसिंग रावल, मुनाफ हकीम, फादर संजय कोहचाडे, शब्बीर विद्रोही, मो. आसीम अली उपस्थित होते.

Web Title: Terrorism can not be Jihadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.