दहशतवादी जयेश उर्फ शाकीर परत बेळगाव कारागृहात; मार्चपासून नागपुरात सुरू होती चौकशी
By योगेश पांडे | Published: November 9, 2023 04:17 PM2023-11-09T16:17:15+5:302023-11-09T16:19:04+5:30
गडकरींच्या कार्यालयात फोन करून दिली होती धमकी
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून १०० कोटी रुपयांची खंडणी मागणारा दहशतवादी जयेश पुजारी ऊर्फ शाकीर याची परत बेळगाव तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून जयेश बेळगावात जाण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करत होता. अगदी त्याने लोखंडाची तार गिळत आत्महत्येचादेखील प्रयत्न केला होता.
जयेश लष्कर-ए-तोएबा, हिजबुल मुजाहिद्दीन, पीएफआयसह अनेक दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात फोन करून खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास गडकरींना उडवून देण्याची धमकी दिली होती. कर्नाटकमधील तुरुंगातून त्याने हे फोन लावले होते. २८ मार्च रोजी त्याला बेंगळुरू तुरुंगातून प्रोडक्शन वॉरंटवर अटक करून नागपुरात आणण्यात आले.
चौकशीदरम्यान त्याचा दहशतवादी संघटनांशी संबंध आणि त्यांच्या मदतीने अनेक मोठ्या दहशतवादी घटना घडवून आणल्याचा खुलासा झाला. त्याच्याविरोधात यूएपीएअंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. जयेशला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. कर्नाटकात अनेक गुन्हे दाखल असून त्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांचाही तपास सुरु आहे. कर्नाटकमध्ये दोन फौजदारी खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे कर्नाटकातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी जयेशला पुन्हा बेळगाव जेलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती आहे. बुधवारी सायंकाळी त्याला कारागृहातून नागपूर पोलिसांच्या विशेष पथकाच्या हवाली करण्यात आले. त्यानंतर त्याला बेळगावला नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष पथक गेले सोडायला
जयेश पुजारीला मार्च महिन्यात विमानानेच आणण्यात आले होते. आता परत त्याला विमानानेच नेण्यात आले. नागपूर पोलिसांचे विशेष पथक त्याच्यासोबत गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जयेशने कर्नाटकात परतण्यासाठी कोर्टात घेतली होती धाव
जयेशने स्वत:ला कर्नाटक येथील बेळगाव मध्यवर्ती कारागृहात स्थानांतरित करून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात न्यायालयाने राज्याच्या गृह विभागाचे सचिवांसह इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर मागविले होते. नागपूर कारागृहात जीवाला धोका असल्याचा दावा त्याने केला होता.