दहशतवादी जयेशने तुरुंगातच गिळली लोखंडी तार, सुरक्षा यंत्रणांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 11:15 AM2023-10-07T11:15:35+5:302023-10-07T11:16:45+5:30
मेडिकलमध्ये तातडीने झाले उपचार : आत्महत्येचा प्रयत्न की दुसऱ्या कारागृहात जाण्यासाठी ड्रामा?
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून १०० कोटी रुपयांची खंडणी मागणारा दहशतवादी जयेश पुजारी ऊर्फ शाकीर याने नागपूर मध्यवर्ती कारागृहात लोखंडी तार गिळल्याने खळबळ उडाली. त्याने खरोखर आत्महत्येचा प्रयत्न केला की दुसऱ्या कारागृहात जाण्यासाठी ड्रामा केला याचा शोध सुरू आहे. मात्र हा प्रकार लक्षात आल्यावर त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकारामुळे कारागृह प्रशासन व सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ झाली.
जयेश लष्कर-ए-तोएबा, हिजबुल मुजाहिद्दीन, पीएफआयसह अनेक दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात फोन करून खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास गडकरींना उडवून देण्याची धमकी दिली होती. कर्नाटकमधील तुरुंगातून त्याने हे फोन लावले होते. २८ मार्च रोजी त्याला बेंगळुरू तुरुंगातून अटक करून नागपुरात आणण्यात आले. चौकशीदरम्यान त्याचा दहशतवादी संघटनांशी संबंध आणि त्यांच्या मदतीने अनेक मोठ्या दहशतवादी घटना घडवून आणल्याचा खुलासा झाला. त्याच्याविरोधात यूएपीएअंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
जयेश न्यायालयीन कोठडीत असून त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. विविध बॅराक्समध्ये उंदीर व इतर कीटक वगैरे येऊ नये यासाठी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. जयेशने त्यातीलच एक तार तोडली व ती गिळली. गुरुवारी त्याने संबंधित प्रकार केला व स्वत:च न्यायालयाला सुनावणीदरम्यान ही माहिती दिली. यानंतर न्यायालयाने पोलिस आणि तुरुंग प्रशासनाला त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले. अगोदर त्याची कारागृह रुग्णालयात तपासणी करण्यात आली व त्यानंतर त्याला तातडीने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी त्याला थोडेसे अस्वस्थ वाटत होते. या एकूण प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ झाली.
सोनोग्राफीत सगळे काही नॉर्मल
जयेशने हा प्रकार नेमका कधी केला हे कारागृहातील कर्मचाऱ्यांनादेखील लक्षात आले नाही. त्याने फारच छोटा तार तोडून गिळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यावर त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्याची सोनोग्राफीदेखील करण्यात आली असून त्यातदेखील काहीच आढळले नाही. आता त्याची प्रकृती एकदम ठीक आहे, अशी माहिती नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या उपअधीक्षक दीपा आगे यांनी दिली.