रेल्वेस्थानकावर दहशतवादी शिरले अन् ....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2023 10:29 PM2023-07-08T22:29:35+5:302023-07-08T22:30:22+5:30
Nagpur News शनिवारी सायंकाळी वेळ ४.३५ वाजताची. अचानक एक मारुती व्हॅन रेल्वेस्थानक परिसरात शिरते. त्यात कथित दहशतवादी असल्याचा संदेश आधीच रेल्वे पोलिसांना मिळालेला असतो. त्यामुळे रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल, दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक असे सारेच सज्ज असतात.
नरेश डोंगरे
नागपूर : शनिवारी सायंकाळी वेळ ४.३५ वाजताची. अचानक एक मारुती व्हॅन रेल्वेस्थानक परिसरात शिरते. त्यात कथित दहशतवादी असल्याचा संदेश आधीच रेल्वे पोलिसांना मिळालेला असतो. त्यामुळे रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल, दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक असे सारेच सज्ज असतात. चोहोबाजूंनी मारुती व्हॅनची घेराबंदी केली जाते. सशस्त्र जवान सावधगिरीने पुढे होतात अन् अखेर व्हॅनमधून दोघांना बाहेर काढले जाते. एक-सव्वा तासाच्या धावपळीनंतर आता रेल्वेस्थानक परिसराला दहशतवाद्यांचा धोका नसल्याचे जाहीर केले जाते. दरम्यान, सशस्त्र पोलिसांची फाैज आणि ती मारुती व्हॅन तसेच त्यातील तरुणांना अटक करण्याचे नाट्य पाहून काहीतरी विपरीत होत असल्याच्या शंकेमुळे उत्कंठता ताणून असलेल्या शेकडो प्रवाशांना ही 'मॉक ड्रिल' असल्याचे सांगितले जाते आणि ते सुटकेचा नि:श्वास टाकतात.
नागपूरचे मध्यवर्ती रेल्वेस्थानक दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे; त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था कशी आहे, त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. वरिष्ठांकडून वारंवार सुरक्षा व्यवस्थेची चाचपणीही केली जाते. याच पार्श्वभूमीवर, दहशतवादविरोधी पथकाचे अधीक्षक (मुंबई) यांनी रेल्वेस्थानकावर अचानक अशी स्थिती निर्माण झाल्यास काय करायचे, कसे करायचे, त्याची प्रत्यक्ष कृतीतून माहिती देण्यासाठी रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज सायंकाळी ४:३५ वाजता दहशतवादविरोधी पथक (एटीएस), रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), सीआयबी, सीताबर्डी पोलिस तसेच अग्निशमन दलाचा ताफा रेल्वेस्थानकावर पोहोचला आणि मॉक ड्रिलला सुरुवात झाली. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात सशस्त्र पोलिस आणि मारुती व्हॅनमधून सिनेस्टाइल ताब्यात घेण्यात आलेल्या कथित दहशतवाद्यांमुळे शेकडो प्रवाशांच्या मनात शंका-कुशंका निर्माण झाल्या होत्या. सायंकाळी ५.५५ वाजता मॉक ड्रिल आटोपल्यानंतर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी काय वास्तव आहे, ते जाहीर केले. त्यानंतर प्रवाशांची गर्दी पांगली.