मेंदूची शक्ती ओळखणारी चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:16 AM2019-02-11T11:16:45+5:302019-02-11T11:19:50+5:30
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) विद्यार्थ्यांनी मेंदूची शक्ती ओळखण्यासाठी एक कॉम्प्युटर प्रोग्रामिंग तयार केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवी मेंदूची शक्ती अफाट आहे, विशेषत: जन्मानंतरची पहिली पाच वर्षे मेंदूचा विकास जोमाने होतो. पण त्या काळात मुलं शाळेत नसतात आणि त्यानंतरचा ६ ते १४ वर्षांचा काळही मेंदूविकासासाठी फार महत्त्वाचा असतो. परंतु अनेकांना एका विशिष्ट वयात किंवा स्पर्धेच्या घाईगर्दीत स्मरणशक्ती, बुद्धी आणि एकाग्रतेमध्ये बिघाड तर झाला नाही ना, याची शंका येते. ही तपासणी करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) विद्यार्थ्यांनी मेंदूची शक्ती ओळखण्यासाठी एक कॉम्प्युटर प्रोग्रामिंग तयार केले आहे. स्टॉल्सवर येणाऱ्या निवडक लोकांच्या मेंदूच्या शक्तीचे आकलन करून देत आहे.
विज्ञान भारती, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट व विश्वेश्वरय्या राष्ट्रीय औद्योगिक संस्थानच्या (व्हीएनआयटी)वतीने आयोजित ‘कुतूहल’ या नाविन्यपूर्ण व आगळ्यावेगळ्या प्रदर्शनात असे २५ विविध शाखेचे १५० स्टॉल्स लागले आहेत. यातीलच एक ‘एम्स’च्या स्टॉल्सवर विद्यार्थी व नागरिकांची गर्दी होत. यात मासे कसे शिकतात, याची माहिती एका चित्रफितीतून विद्यार्थ्यांना दिली जात आहे. याशिवाय, बीपी आॅपरेटर, ईसीजी तंत्रज्ञानाची माहिती, मायक्रोस्कोपमधून मानवी पेशी दाखविण्याची सोयही येथे केली आहे.
असा होतो दात तयार
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या बालदंत रोग विभागाच्या स्टॉल्समधून विविध मॉडेल्सद्वारे दुधाचे दात, त्याची वाढ आणि नंतर पक्के दात कसे येतात, त्याची माहिती उपलब्ध करून दिली आहे. विभागप्रमुख डॉ. रितेश कळसकर हे स्वत: त्याची माहिती विद्यार्थ्यांना देत आहेत. मूल जन्मल्यानंतर साधारण सहा महिन्यात दुधाचे मूळ कसे तयार होते. त्याचवेळी तयार होणारे पक्क्या दाताचे मूळ, वयाच्या सातव्या वर्षापासून दुधाच्या दाताचे मूळ झिजून पक्क्या दाताचे मूळ त्याला कसे समोर ढकलते, याची संपूर्ण माहिती ‘मॉडेल्स’द्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली जात आहे. विशेष म्हणजे, खेळताना किंवा अपघातात दात पडल्यावर त्याचा सांभाळ कसा करावा, त्या दाताचे पुन्हा कसे रोपण केले जाऊ शकते, याची माहितीही येथे दिली जात आहे.
असे चालते शस्त्रक्रियागृहाचे कामकाज
सामान्यांच्या मनात नेहमीच शस्त्रक्रियागृहाच्या दारावरील लाल दिव्याच्या मागे काय घडत असेल, शस्त्रक्रियागृह कसे असेल, याचे कुतूहल असते. इंडियन सोसायटी आॅफ अॅनेस्थिशिआलॉजिस्टने ‘ओपन आॅपरेशन थिएटर’ या प्रदर्शनात उपलब्ध करून दिले आहे. येथे ‘ओटी’ टेबल, अॅनेस्थिशिस्टचे यंत्र, मॉनिटर्स, आपात्कालीन ट्रॉली, व्हेंटीलेटर अशी सर्व यंत्रे ठेवली आहेत. याशिवाय अतिदक्षता विभागात काळजी घेण्यासाठी कोणती उपकरणे लागतात, तीदेखील येथे ठेवण्यात आली आहेत. सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. सुनीता लवंगे, डॉ. शीतल दलाल, डॉ. उमेश रमतानी यांच्या विशेष प्रयत्नातून हे अतिदक्षता विभाग व शस्त्रक्रियागृह साकारण्यात आले आहे.
अवयवदानाचे महत्त्व
विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र (झेडटीसीस), नागपूर व मोहन फाऊंडेशन, नागपूर शाखेच्यावतीने या प्रदर्शनात अवयवदानाचे महत्त्व सांगितले जात आहे. झेडटीसीसीचे सचिव डॉ. रवी वानखेडे स्टॉल्सवर येणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ब्रेन डेड’ म्हणजे काय, ‘ब्रेन डेड’ झाल्यावर कोणकोणत्या अवयवाचे दान करता येते, याची माहिती अवयवाचे मॉडेल व भित्तीपत्रकाच्या माध्यमातून देत आहे. झेडटीसीसीच्या समन्वयिका वीणा वाठोरे, सामाजिक कार्यकर्ता सलीम अजाणी स्टॉल्सवर येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांकडून अवयवदानाचे अर्जही भरून घेत आहेत.
जाणून घ्या, येणाऱ्या ‘हार्ट अटॅक’चा धोका
विवेका हॉस्पिटलच्या स्टॉल्समधून हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत जगताप हे विविध मॉडेल्स व स्क्रीनच्या मदतीने हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) कसा येतो. अँजिओग्राफी कशी केली जाते, हृदय कमजोर झाल्यास पेसमेकर कसे बसविले जाते. हृदयाचे ‘व्हॉल्व्ह’चे कार्य कसे असते. शस्त्रक्रियादरम्यान ते कसे बसविले जाते. अँजिओप्लास्टी कशी केली जाते. त्याचे विविध प्रकार, विशेष म्हणजे, हार्ट अटॅकचा धोका होऊ शकतो का, याची माहितीही उपलब्ध करून दिली आहे. या स्टॉल्सवर विविध प्रकारातील ‘स्टेंट’ ‘बलून्स’ प्रदर्शित करण्यात आले आहेत.
प्रत्यक्ष अवयव पाहून, कार्याची घेतली माहिती
मेडिकलच्या शरीररचनाशास्त्र विभागाचे या प्रदर्शनात दोन स्टॉल्स आहेत. यात शरीरातील विविध अवयव आणि त्यांच्या कार्याची माहिती उपलब्ध करून दिली आहे. मेंदू, फुफ्फुस, हृदय, जठर, यकृत, प्लिहा, मूत्रपिंड, मूत्राशय, लहान आतडे, मोठे आतडे आदी अवयव प्रदर्शित केले आहे. दुसऱ्या स्टॉल्समध्ये शरीरातील कवटीपासून ते पायाचे हाड ठेवले आहे. या स्टॉल्सवर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.