अफवांवर विश्वास न ठेवता चाचणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:08 AM2021-04-15T04:08:20+5:302021-04-15T04:08:20+5:30
मौदा : शहरात व तालुक्यातील नागरिकांनी कोरोना लसीकरणाला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे लसीकरणाची टक्केवारी ७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. कोरोनाचा ...
मौदा : शहरात व तालुक्यातील नागरिकांनी कोरोना लसीकरणाला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे लसीकरणाची टक्केवारी ७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, जर काही लक्षणे आढळल्यास प्रत्येकाने कोरोना चाचणी करून घ्यावी. तालुक्यात विविध आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रावर चाचणी सुविधा उपलब्ध आहे. मौदा, चिरव्हा, खात, तारसा व कोदामेंढी या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे. कोरोना चाचणी आणि लसीकरण याबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारे संदेश फिरत आहेत. त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन मौदा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रूपेश नारनवरे यांनी केले आहे.
आशावर्कर, शिक्षक, नगर पंचायत कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी, राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते यांनी कोविड लसीकरणाबाबत जनजागृती केली. त्यामुळे तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. आजतागायत तालुक्यात ७५ टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. प्रत्येकाने मास्क वापरणे, गर्दी टाळणे, हात वारंवार धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे, यासारखे प्रतिबंधात्मक नियमाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे तरच आपण कोरोनाला हद्दपार करण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास डॉ. नारनवरे यांनी व्यक्त केला.