“सरकार दाऊदला साथ देतेय, भाजपचा दुटप्पीपणा समोर”; अंबादास दानवेंची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 08:07 PM2023-12-18T20:07:33+5:302023-12-18T20:12:07+5:30

Winter Session Maharashtra 2023: सभापती नियमाप्रमाणे सभागृहाच कामकाज चालू देत नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

thackeray group ambadas danve criticised state govt and bjp in winter session maharashtra 2023 | “सरकार दाऊदला साथ देतेय, भाजपचा दुटप्पीपणा समोर”; अंबादास दानवेंची सडकून टीका

“सरकार दाऊदला साथ देतेय, भाजपचा दुटप्पीपणा समोर”; अंबादास दानवेंची सडकून टीका

Winter Session Maharashtra 2023: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच विरोधकांनी विधान परिषद सभागृहात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जवळचा मानला गेलेला इब्राहिम कासकर याच्या घरातील लग्नाला भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी हजर असल्याची २८९ अनव्ये चर्चा उपस्थित केली होती. मात्र, सभापतींनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधकांना बोलण्यास मज्जाव केला, त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. यानंतर मीडियाशी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली.

एकीकडे सत्ताधारी विरोधकांना सतत हिंदुत्ववादावरून टीका करत असतात. मात्र देशद्रोही असलेल्या दाऊदच्या घरच्या लग्नाला त्यांचेच मंत्री, आमदार व पदाधिकारी हजेरी लावतात, ही बाब गंभीर आहे. विरोधकांनी यावर २८९ अनव्ये सभागृहात चर्चा उपस्थित केली. मात्र सभापती यांनी विरोधकांची भूमिका ऐकून घेतली नाही. सभापती या एककल्लीपणे सभागृह चालवत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. तसेच यावेळी भाजप नेते, मंत्री विवाहास उपस्थित असल्याचे काही फोटोही मीडियाला दाखवले. 

सभागृहात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री यांनी येऊन यावर खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र रातोरात पत्रिका बदलण्यात आली. देशद्रोही इकबाल मिरची याचे संबंध माजी खासदार प्रफुल पटेल यांच्याशी असलेले चालते. आम्ही नवाब मालिक यांच्या विरोधात बोलल्यावर सरकार त्यांची बाजू घेते. एकप्रकारे सरकार हे दाऊदला साथ देत असून हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजपचा हा दुटप्पीपणा समोर आल्याचा घणाघात अंबादास दानवे यांनी केला.

दरम्यान,सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य व आमदार एकनाथ खडसे, आमदार भाई जगताप, आमदार बंटी पाटील, आमदार अनिल परब यांनी सभागृहात बोलण्याचा प्रयत्न केला असता सभापती यांनी  त्यांना बोलण्यास मज्जाव केला. २८९ हा विरोधकांचा प्रस्ताव असतानाही सभापती या नियमाप्रमाणे सभागृहाच कामकाज चालू देत नाही. एकांगीपणे सभागृह चालवितात. विरोधकांना प्रश्न विचारू देत नसल्यामुळे आम्ही सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार घातल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.
 

Web Title: thackeray group ambadas danve criticised state govt and bjp in winter session maharashtra 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.