सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी! म्हणाल्या, "मला विश्वास नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 10:20 IST2024-12-17T10:11:34+5:302024-12-17T10:20:45+5:30
आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी! म्हणाल्या, "मला विश्वास नाही..."
Sushma Andhare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूर विमानतळावर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. सुषमा अंधारे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. यावेळी सुषमा अंधारे याच्यासोबत त्यांची सात वर्षांची मुलगी देखील होती. या सगळ्या प्रकारानंतर सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच शासनाच्या सुरक्षेवर आपला विश्वास नसल्याचेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे मंगळवारी नागपुरात पोहोचल्या होत्या. यावेळी विमानतळावरुन बाहेर पडत असतानाच एका व्यक्तीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. तसेच त्यानंतर ती व्यक्ती जय श्री रामच्या घोषणा देत तिथून निघून गेल्याचेही अंधारे यांनी म्हटलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमधून या घटनेची माहिती दिली आहे.
"परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालु आहे. अशातच आत्ता 3 वाजून 36 मिनिटांनी नागपूर विमानतळावर departure gate ला विचित्र घटना घडली. मी, माझी ७ वर्षांची लेक आणि समता सैनिक दलाच्या ऍड. स्मिता कांबळे यांच्या समवेत होते. साधारण ६ फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमी प्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणुन वर बघितले तर तो जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. गेट वरील सुरक्षा रक्षक थोडे पुढे सरसावले तसा तो जय श्रीराम च्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला," असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
"देवेंद्र जी ,आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खुपदा वाटले. मात्र दहशत आणि दबावतंत्राचे हे गलिच्छ राजकरण मुख्यमंत्री म्हणून आपल्यापर्यंत पोचवणे ही नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे असे वाटले. टीप शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही. कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही. बाकी आपली मर्जी," असेही सुषमा अंधारेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.