फुकेंच्या मागणीला ठाकरेंचा दुजोरा
By admin | Published: July 21, 2016 02:07 AM2016-07-21T02:07:58+5:302016-07-21T02:07:58+5:30
महापालिकेतर्फे चालविण्यात येत असलेल्या बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल केंद्र मे. सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल या कंत्राटदाराला देण्यात आले आहे
महापौरांचे चौकशीचे निर्देश : बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजलमध्ये अनियमितता
नागपूर : महापालिकेतर्फे चालविण्यात येत असलेल्या बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल केंद्र मे. सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. बायोमेडिकलची ४८ तासांच्या आत विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु यात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक परिणय फुके यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत केली. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनीही त्यांच्या मागणीला दुजोरा देत, या प्रकरणाच्या संपूर्ण नस्तीची चौकशी करण्याची मागणी केली.
नागपूर शहरात ६३० हॉस्पिटल असून ९४१९ बेड आहेत. या हॉस्पिटलमधील बायोमेडिकल गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचा कंत्राट मे. सुपर्ब हायजेनिक या कंपनीला देण्यात आला आहे. परंतु बायोमेडिकलची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. कंत्राटाच्या बदल्यात महापालिकेला २३ लाख ५० हजारांची रॉयल्टी वर्षाला मिळत आहे. यात दरवर्षी १० टक्के वाढ केली जाते. अतुल झोटिंग हे या कंपनीचे डायरेक्टर आहेत. २००४ साली या कंपनीला ३० वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. सुरुवातीला मनोज गोलावार व त्यांच्या पत्नी या कंपनीचे संचालक होते. परंतु २०१२ मध्ये ते या कंपनीतून बाहेर पडले आहेत. आता अतुल झोटिंग, अतुल थुटे व विजय चौधरी संचालक असल्याची माहिती आरोग्य अधिकारी प्रदीप दासरवार यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली. प्लास्टिक वेस्टचा पुनर्वापर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनुमतीशिवाय करता येत नाही. कंपनीने अनुमतीपत्र जोडलेले नाही. तसेच शासन अनुमतीशिवाय कंत्राट देता येतो का, असा मुद्दा फु के यांनी उपस्थित केला होता. या प्रस्तावाला शासन अनुमती असल्याची माहिती दासरवार यांनी दिली.
उपमहापौर सतीश होले यांनी बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल कारखान्यावर छापा घातला. परंतु यात त्यांना काही आढळून आले का. महापौर व उपमहापौरांनी जनतेच्या हितासाठी अशा कारवाया करायलाच हव्यात. मी महापौर असताना छापा घालून गैरव्यवहार उघडकीस आणला होता. १२ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. अशा स्वरूपाच्या कारवाया व्हायलाच हव्यात, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली. या प्रकरणाची चौकशी करून पुढील सभेत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले. (प्रतिनिधी)