नागपुरात थायलंडच्या तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 08:09 PM2018-09-17T20:09:57+5:302018-09-17T20:13:25+5:30
चेंजिंग रूममध्ये शिरून एका थायलंडच्या तरुणीवर मॉलमधील एका कर्मचाऱ्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी ५ ते ५.३० च्या दरम्यान ही संतापजनक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चेंजिंग रूममध्ये शिरून एका थायलंडच्या तरुणीवर मॉलमधील एका कर्मचाऱ्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी ५ ते ५.३० च्या दरम्यान ही संतापजनक घटना घडली. जयसिंग प्रीतमसिंग परिहार (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, संतप्त जमावाने आरोपीला चोप दिला. तर, पोलिसांनी नंतर त्याला अटक केली.
येथील रोहण नामक तरुण उन्हाळयाच्या सुटीत थायलंडला फिरायला गेला होता. तेथे त्याची पीडित तरुणीसोबत (वय २२) मैत्री झाली. तेव्हापासून ते मोबाईल, फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. नागपुरातील गणेशोत्सव बघण्यासाठी आपण भारतात येत असल्याचे तिने रोहणला कळवले. त्यानुसार ती १० सप्टेंबरला मुंबईत आणि ११ ला सायंकाळी नागपुरात आली. वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये ती मुक्कामी थांबली आहे. रविवारी ती आवश्यक कपडे खरेदी करण्यासाठी रोहणसोबत सीताबर्डीतील इटर्निटी मॉलमध्ये गेली. कपडे व्यवस्थित आहे की नाही ते बघण्यासाठी ती चेंजिंग रूममध्ये गेली. ती कपडे बदलवित असताना तिच्यावर नजर ठेवून असलेला आरोपी परिहार चेंजिंग रूममध्ये शिरला अन् त्याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. तरुणीने आरडाओरड केल्याने रोहन तसेच मॉलमधील अन्य मंडळी धावली. त्यांनी परिहारला पकडून चोप दिला. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांना माहिती देऊन बोलविण्यात आले.
पोलिसांकडून गंभीर दखल
आरोपी परिहार हा महादुला कोराडी येथील श्रीवासनगरात राहतो. तो मॉलमध्ये सेल्समन म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. सीताबर्डीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी पीडित तरुणी आणि तिच्या मित्राला धीर दिला. त्यांना आश्वस्त करीत आरोपीविरुद्ध कलम ३५४ (अ) गुन्हा नोंदवून परिहारला अटक केली.