ताडोबा सफारीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या ठाकूर बंधूंना दणका
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: January 22, 2024 06:16 PM2024-01-22T18:16:25+5:302024-01-22T18:17:30+5:30
अभिषेक व रोहितकुमार विनोदसिंग ठाकूर अशी आरोपींची नावे असून ते ताडोबा जंगल सफारीचे बुकिंग करणाऱ्या वाईल्ड कनेक्टीव्हिटी सोल्युशन्स फर्मचे भागिदार आहेत.
नागपूर : ताडोबा जंगल सफारी बुकिंगमध्ये १२ कोटीपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार करणाऱ्या ठाकूर बंधूंना मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचा दणका बसला. न्यायालयाने दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावला. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला.
अभिषेक व रोहितकुमार विनोदसिंग ठाकूर, अशी आरोपींची नावे असून ते ताडोबा जंगल सफारीचे बुकिंग करणाऱ्या वाईल्ड कनेक्टीव्हिटी सोल्युशन्स फर्मचे भागिदार आहेत. चंद्रपूरमधील रामनगर पोलिसांनी विभागीय वनाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून या आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन फाउंडेशनने जंगल सफारीच्या ऑनलाईन बुकिंगकरिता वाईल्ड कनेक्टीव्हिटी सोल्युशन्ससोबत १० डिसेंबर २०२१ रोजी करार केला होता. त्यानंतर सोल्युशन्सने करारातील अटी व शर्तींचा भंग करून जंगल सफारी बुकिंगचे १२ कोटी १५ लाख ५० हजार ८३१ रुपये वन विभागाला अदा केले नाही. बुकिंगसंदर्भात आवश्यक पुरावेही सादर केले नाही. या फसवणुकीमुळे सोल्युशन्ससोबतचा करार रद्द करण्यात आला.
सरकारचा जामिनाला जोरदार विरोध
सरकारचे वकील ॲड. विनोद ठाकरे व वन विभागाचे वकील ॲड. कार्तिक शुकुल यांनी आरोपींच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. आरोपींनी ताडोबा सफारीचा वैयक्तिक व्यवसायासाठी उपयोग केला. त्यांनी प्रकरणाच्या तपासाला सहकार्य केले नाही. बुकिंगचा डेटा दिला नाही. पुरावे नष्ट करण्यासाठी डेटा नष्ट केला. त्यांनी विविध बँकांमध्ये २७ खाते उघडून तेथे रक्कम स्थानांतरित केली. सरकारला जीएसटी दिला नाही. ३३४ जिप्सी मालक व ३३४ गाईड्सचे शुल्क अदा केले नाही. पोलिसांना त्यांच्याकडून संगणक, कागदपत्रे, मोबाईल इत्यादी वस्तू जप्त करायच्या आहेत. त्यामुळे त्यांना अटक करणे आवश्यक आहे, असे ॲड. शुकुल व ॲड. ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाला प्रथमदृष्ट्या त्यात तथ्य आढळून आले.