नागपुरातील पिवळ्या नदीची थातूरमातूर सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:04 AM2018-06-10T01:04:35+5:302018-06-10T01:05:58+5:30
मानकापूर परिसरातून वाहणाऱ्या पिवळ्या नदीच्या पात्राची महापालिकेतर्फे थातूरमातूर सफाई करण्यात आली आहे. नदी पात्रात वाढलेली झाडे, झुडपे पूर्णपणे काढलेली नाहीत. गाळ साचला आहे. यामुळे प्रसंगी जोरदार पाऊस झाला तर नदी पात्रातील पाणी शेजारच्या वस्त्यामध्ये शिरून मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानकापूर परिसरातून वाहणाऱ्या पिवळ्या नदीच्या पात्राची महापालिकेतर्फे थातूरमातूर सफाई करण्यात आली आहे. नदी पात्रात वाढलेली झाडे, झुडपे पूर्णपणे काढलेली नाहीत. गाळ साचला आहे. यामुळे प्रसंगी जोरदार पाऊस झाला तर नदी पात्रातील पाणी शेजारच्या वस्त्यामध्ये शिरून मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गोरेवाडा, सुरजनगर, सादिकाबाद कॉलनी, झिंगाबाई टाकळी, मानकापूर हा परिसर पिवळ्या नदीला लागून आहे. हा परिसर पुरासाठी अतिशय संवेदनशील आहे. मानकापूर येथे पिवळ्या नदीवर बांधलेला पूल अत्यंत संकीर्ण असल्यामुळे येथे पुरातील काडीकचरा अडकून पाणी वस्त्यांमध्ये शिरण्याचा धोका असतो. पिवळ्या नदीची सफाई व खोलीकरण केल्यास हा धोका कमी होऊ शकतो. दोन वर्षांपूर्वी असाच धोका निर्माण झाला होता व या परिसरातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले होते. मात्र, यापासून धडा घेत नदीपात्राची व्यवस्थित सफाई करण्यात आलेली नाही. याकडे परिसरातील नागरिकांनी लक्ष वेधले असता मंगळवारी झोनच्या अधिकाºयांनी लक्ष दिले नाही. महापालिकेने असेच दुर्लक्ष केले तर भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिकेने याची दखल घ्यावी व त्वरित पिवळी नदीची सफाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक अरुण डवरे, अशोक वानखेडे, कृष्णा कोचे, सतीश अॅन्थोनी, सिद्धार्थ टेंभूर्णे, विजय डागोरे, शिवशंकर गोंडाणे, शशिकला फुलझेले, रमेश वानखेडे आदींनी केली आहे.